वृत्तसंस्था/ किंबर्ली
द. आफ्रिकेत सुरू झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणकडून सलामीच्या सामन्यात यजमान द. आफ्रिका युवा संघाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणने द. आफ्रिकेचा सात गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. अफगाण संघातील शफीकउल्ला घेफारीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सलामीच्या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेचा डाव 29.1 षटकात 129 धावात आटोपला. त्यानंतर अफगाणने 25 षटकात 3 बाद 130 धावा जमवित हा सामना जिंकला.
द. आफ्रिकेच्या डावात कर्णधार पार्सन्सने 42 चेंडूत 7 चौकारासह 40, कोझीने 23 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 38 आणि बिफोर्टने 39 चेंडूत 4 चौकारासह 25 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे गेफारीने 15 धावात 6 गडी बाद केले. फजल हक आणि नुर अहमद यानी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावात इब्ा्राहिम झेद्रानने 72 चेंडूत 8 चौकारासह 52 तर इम्रानने 48 चेंडूत 9 चौकारासह 57, कर्णधार झकीलने 12 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 18 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेच्या क्लोटेने 20 धावात दोन तर ह्युरेनने 14 धावात 1 गडी बाद केला. झेद्रान आणि इम्रान यानी दुसऱया गडय़ासाठी 80 धावांची भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक– द. आफ्रिका 29.1 षटकात सर्वबाद 129 (पार्सन्स 40,बिफोर्ट 25, कोझी 38, गेफारी 6-15), अफगाण-25 षटकात 3 बाद 130 (झेदान 52, इम्रान 57, क्लोटे 2-20, ह्युरेन 1-14).









