पद्म पुरस्कारांसाठी केंद्र सरकारची राज्यांना सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
समाजाच्या हितासाठी तन मन धन अर्पण करून झटणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहून आपले कार्य करीत असतात. अशा अप्रकाशीत कार्यकर्त्यांना पद्मपुरस्काराने सन्मानीत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. अशा समाजसेवकांचा शोध घेण्यासाठी राज्यांनी शोध समित्या स्थापन कराव्यात, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 2014 पासून पद्म पुरस्कारांच्या संदर्भात हे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या पण समाजासाठी खऱया अर्थाने वाहून घेतलेल्या, तसेच अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करणाऱया अनेक व्यक्ती गेल्या सात वर्षात देशाला माहित झाल्या आहेत. हेच धोरण पुढे सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांचेही साहाय्य घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ही सूचना करण्यात आली.
यंदाचे पद्म पुरस्कार 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनी वितरीत केले जाणार आहेत. त्यासाठी योग्य व्यक्तींचे निवड करण्याचे काम सुरु आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त असलेल्या पण लोकांसाठी महत्त्वाची कार्ये करणाऱया व्यक्तींना शोधणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे राज्यांनी विशेष समित्या स्थापन करून अशा व्यक्तींचा शोध घ्यावा व त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण जनहितैषी कार्याची माहिती केंद्र सरकारला द्यावी. त्यातून केंद्र सरकार पद्म पुरस्कारांसाठी निवड करेल, अशी सूचना सर्व राज्यांना पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.









