मंगेश जोशींनी दिलेल्या निर्णयांवर आक्षेप : महागाईविरोधातही जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
अप्पर जिल्हाधिकारी हटाव.. पर्यावरण बचाव, अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कालावधीत झालेले जमीन निवाडे व निर्णयांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली. महागाईविरोधातही घोषणाबाजी करीत निवेदन देण्यात आले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी बेकायदेशीरपणे मायनिंगला परवानग्या दिल्या आहेत. इकोसेन्सिटिव्ह गावांमध्ये परवानग्या दिल्या आहेत. कळणे मायनिंगबाबतीतही याच अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्घटना घडली आहे. यामध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाले असून अशा अधिकाऱयावर कारवाई झाली पाहिजे आणि असे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हय़ात नको, असे स्पष्ट करीत ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी हटाव’च्या मागणीसाठी सोमवारी मनसे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सादर केले.
सिंधुदुर्गनगरी येथील सिडको भवन येथे एकत्र जमून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिन तावडे, विनोद सांडव, दत्ताराम बिडवाडकर, चंदन मेस्त्राr, जिल्हा संघटनेचे बाळा पावसकर, दया मेस्त्राr, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, कुणाल किनळेकर, अमित इब्राहिमपूरकर, आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, सचिन सावंत, आपा मांजरेकर, राजेश टंगसाळी आदींसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करताना जिल्हय़ात सर्व खनिजांना नियमबाहय़ मंजुरी देणाऱया अप्पर जिल्हाधिकाऱयांची बदली करावी, त्यांच्या कालखंडात झालेले जमीन निवाडे, डंपर व खनिजांचे दंड माफ करण्याच्या अपिलांवर झालेल्या निवाडय़ाची फेरचौकशी करावी, अप्पर जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानात न राहिल्यामुळे नादुरुस्त झालेल्या शासकीय निवासस्थानाच्या नुकसानीची वसुली करावी अशा विविध 16 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकाऱयांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यासाठी त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱयांनी मागण्यांची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गॅस, पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच तेल व इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. महागाईचा चटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेत. त्यामुळे महागाईविरोधातही जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली. सिडको भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दुपारी 12 वाजता पोहोचताच पोलिसांनी कडे करून प्रवेशद्वारावर हा मोर्चा रोखला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी उपरकर यांनी मार्गदर्शन केले. जमावबंदी असतानाही मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या 25 कार्यकर्त्यांना अटक केली व प्रतिबंधात्मक कारवाई करून सुटका केली.









