बेडकिहाळ :
बेडकिहाळ येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पैठणीची मानकरी अपेक्षा राकेश घोडके या ठरल्या. तर विजयलक्ष्मी गोपाळ बडिगेर यांनी द्वितीय क्रमांकाचे पैंजण तर नेहा सतीश कोळेकर यांनी तिसऱया क्रमांकासाठीची जोडवी पटकाविली.
येथील दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रविवार दि. 12 रोजी शिवाजी पेठ परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मीना वडेर तर प्रमुख पाहुण्या म्हणून लक्ष्मीबाई पाटील, डॉ. श्रेया इनामदार, प्रेमकुंजा नलवडे, सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील या उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक संगीता पाटील यांनी केले.
बेडकिहाळ येथे प्रथमच आयोजित या स्पर्धेत 40 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. मीना वडेर म्हणाल्या, राजमाता जिजाऊंची शिकवण आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणार असून एक आदर्श माता घडण्यासाठी जिजाऊंचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. कार्यक्रमास बेडकिहाळ परिसरातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रुपाली पाटील, विनंती घोडके व पूर्वा पाटील यांनी केले. आभार भावना इनामदार यांनी मानले.