बसमध्ये विद्यार्थ्यांची तोबा गर्दी : बसफेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून त्या तुलनेत बसफेऱया कमी असल्याने प्रवाशांची फरफट होताना दिसत आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयेदेखील सुरू झाल्याने बसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे होल होताना दिसत आहेत. त्यामुळे परिवहनने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. शहरातील आरपीडी कॉर्नर, यंदे खुट, ध. संभाजी चौक, चन्नम्मा चौक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे बस पकडताना विद्यार्थ्यांची फरफट होताना दिसून येत आहे. आरपीडी मार्गावर बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसचालक बसथांब्यावर बस न थांबवता शंभर-दोनशे फूट पुढे नेऊन बस थांबवतात. दरम्यान, बस पकडण्यासाठी विद्यार्थी पाठीमागे धावतात. परिवहनच्या अपुऱया व अनियमित बससेवेमुळे असे प्रकार दररोज शहरातील मुख्य चौकात घडत असून शहरांतर्गत बससेवा सुरळीत करून बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. लॉकडाऊनदरम्यान परिवहनने काही बसेस बंद केल्या होत्या. त्या अद्याप सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील काही गावच्या बसेस बंद आहेत. त्यामुळे शहरांतर्गत प्रवास करणाऱया प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असून परिवहनने तातडीने बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.









