सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्पष्टीकरण, जिल्हा बँकेत मजुर तर विधानपरिषदेसाठी स्वतंत्र व्यवसाय म्हणुन नोंद
वार्ताहर / कराड
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा बँकेत मजुर संस्था प्रवर्गातुन येऊन संचालक व अध्यक्ष म्हणुन काम पाहिले. त्याचवेळी विधानपरिषदेचा अर्ज भरताना स्वतंत्र व्यवसाय म्हणुन नोंद केली. याबाबत आपचे शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत दरेकर हे मजुर संज्ञेत बसत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. त्यामुळे त्यांचा सहकार विभागावर रोष असणे स्वाभाविक आहे. त्याचवेळी विधानपरिषदेत स्वतंत्र व्यवसाय म्हणुन लोकसेवक होऊन त्यांनी फसवणूक केल्याने त्यांच्यावर गृह विभागाच्या वतीने गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी सातारा येथे सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराबाबत वक्तव्य केले होते. तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेब पाटील यांचा दबाव होता असा आरोप केला होता. यावर उत्तर देताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. दरेकर मजुर म्हणुन मुंबई बँकेत संचालक व अध्यक्ष म्हणुन अनेक वर्षे काम करत होते. संस्थेत त्यांना रंगारी म्हणुन दाखवण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी रोख 25 हजार रूपयांचा मोबदलाही घेतला आहे. तर विधानपरिषदेला उभे राहताना प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. त्यामुळे प्रविण दरेकर यांनी फसवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपचे शिंदे यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीतुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
प्रविण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत महाविकास आघाडी सरकारची सूडाची भूमिका निश्चित नाही. मात्र कारवाईचा त्यांना राग आल्याने ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेत असताना प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा म्हणजे डाटा बसेल, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला. तसेच दरेकरांनी मोगम आरोप करू नयेत खोटी कर्जे कुणी दिली, कुठे दिली याची माहिती द्यावी त्याची निश्चित चौकशी केली जाईल असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.
फडणवीसांनी 2024 पर्यंत थांबण्याचे मान्य केलंय
भाजपातुन बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या आमदारांना थांबवण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडुन महाआघाडीचे सरकार पडणार असल्याची स्वप्न दाखवण्यात येत आहेत. चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे व भाजपातील अनेक नेत्यांनी सरकार पडण्याच्या तारखाही जाहीर केल्या होत्या. मात्र नेत्यांनी दिलेल्या सर्व तारखा ओलंडुन गेल्या आहेत. तरीही सरकार पडले नाही. वास्तविक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे हे सरकार पडणार नाही. त्यामुळे त्यांनी 2024 पर्यंत थांबण्याचं मान्य केलंय असा टोला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.
सरकारच्या कामात अडथळा आणण्याचे काम
महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर कोरोनाचे संकट आले. या काळात सरकारने अत्यंत चांगल्याप्रकारे काम करीत राज्यातील रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले. कोरोनामुळे महसुल वाढला नाही तरीही विकास सुरूच आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने महाराष्ट्राला चांगली दिशा दर्शवण्याचे काम सुरू असताना विरोधी पक्षाकडुन मात्र सरकारच्या कामात अडथळे आणण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला मोठमोठे आरोप करायचे नंतर काय समोर येतंय ते महाराष्ट्राला माहित आहे, असे बाळासाहेब पाटील म्हणाले.
बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलनंतर
बाजार समित्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवुन खऱया अर्थाने विकास साधता येतो. याचे गमक उमगल्याने सध्या राज्यभर सुरू असलेल्या सहकारी सेवा सोसायटय़ांच्या निवडणुकांत चुरस पहावयास मिळत आहे. एप्रिल अखेरपर्यंत सर्व सोसायटय़ांच्या निवडणुका पार पडतील. त्यानंतर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. असे सुतोवाच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करू नये गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊसासाठी मात्र पोषक वातावरण झाल्याने यावर्षी साचे अतिरीक्त उत्पादन झाले आहे. त्यात काही कारखाने बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण उसाचे नियोजन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. संपुर्ण ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत अशाही सूचना दिल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.









