प्रतिनिधी / वडूज :
वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलमधील शालेय विद्यार्थ्यांच्या फी चा अपहार केल्याप्रकरणी उपशिक्षक आनंदा विठोबा जगदाळे रा. पेडगांव (सध्या रा.वडूज) यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत छ. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार उपशिक्षक जगदाळे यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नैदानिक परिक्षा, सराव चाचण्या, प्रथम सत्र, पूर्व परिक्षा, सराव परिक्षा 1 व 2, जादा सराव परिक्षा (घरी), एन.टी.एस. सराव, विद्यार्थी दिन, दहावी निरोप समारंभ, गणेशोत्सव आदींसाठी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2019-20 ला जगदाळे 10 वी क चे वर्गशिक्षक म्हणून कामकाज पाहत होते. या वर्गात 63 विद्यार्थी आहेत. पैकी दोन विद्यार्थ्यांची फी माफ करुन इतर विद्यार्थ्यांची प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 61 हजार फी गोळा केली होती. सदरची फी जगदाळे यांनी परिक्षा विभागप्रमुख घनवट मॅडम यांच्याकडे जमा न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. याबाबत मुख्याध्यापक जाधव यांनी फी जमा करण्यासंदर्भात कार्यालयात बोलावून विचारणा केली असता जगदाळे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याबरोबर फी जमा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गोडसे यांनी नाईलाजास्तव त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. हावालदार शांताराम ओंबासे अधिक तपास करत आहेत.









