पीडित बालिकेवर पुणे येथे उपचार सुरू
प्रतिनिधी/ सातारा
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोवई नाक्यावरुन चार वर्षाच्या बालिकेचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण करुन शेंद्रे गावच्या हद्दीत नेऊन बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस आरोपींच्या शोधात पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोरच पोलिसांनी संशयास्पद म्हणून चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत पारधी समाजाने गोंधळ घातला. यातील एका युवकाने विषारी औषध खाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तालुका पोलिसांवर पारधी समाजातील त्या कुटुंबाकडून लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील पोवई नाक्यावरुन पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चार वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले अन् तिला शेंद्रे नजिक नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सकाळी तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. जेव्हा आपली मुलगी शोधूनही सापडत नसल्याने त्यांनी शोध घेतल्यानंतर मुलगी सोनगावनजिक जखमी अवस्थेत आढळून आली. याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मुलीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्याच्या सूचना देताच त्या मुलीच्या नातेवाईकांनी उपचारासाठी नेले आहे. दरम्यान, याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके यांनी आपले खास खबरे लावून पथके रवाना केली आहेत. ही घटना घृणास्पद व भितीदायक असल्याने सातारा तालुका पोलिसांनी संबंधिताचा शोध घेण्यासाठी पोलीस मागावर आहेत.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवास्थानासमोरच धिंगाणा
गृहराज्यमंत्री विधीमंडळाच्या अधिवेशनानिमित्ताने मुंबईत आहेत. त्यांच्या निवासस्थानासमोर दुपारी पारधी समाजाने जोरदार धिंगाणा घातला. त्या धिंगाण्याची कानकुन सातारा शहर पोलिसांना लागताच तत्काळ मोठा बंदोबस्त निवासस्थानासमोर लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यत पारधी समाजाच्या रोहित पितांबर शिंदे (वय 20, रा. खेड) याने विषारी औषध खाल्ले तर पितांबऱया शिंदे व त्याची पत्नी या दोघांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे ए.पी.आय दळवी, पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि परिहार यांनी रोहित याच्यावर संशय घेऊन कसलीही चौकशी न करता रोहित याला मारहाण करत चौकशीला नेत होते. हा अन्याय असून आम्ही पोलिसांना सहकार्य करायला तयार आहे. परंतु पोलिसांची दडपशाही चुकीची आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे.
पोलिसांवरील आरोप धांदात खोटे
मला काहीच प्रकार माहिती नाही. मी बाहेर आहे अशा शब्दात दळवी यांनी स्पष्ट केले तर घोडके यांनी पोलिसांवरील झालेले आरोप पूर्णतः निराधार आणि चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच आम्ही त्या युवकाच्या घरी गेलोच नव्हतो. त्याला पकडलेच नाही तर मारहाण करण्याचा प्रश्न येतोच कुठं?, आमचे पथक अद्यापही संशयिताचा शोध घेत आहे.









