गोकुळ शिरगाव / वार्ताहर
गोकुळ शिरगाव (ता. करवीर ) येथून राहत्या घरातून अज्ञात इसमाने २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चे सुमारास आपली मुलगी कुमारी मयुरी कुशाबा पवार (वय १२ वर्षे) रा. मसोबा माळ ,गोकुळ शिरगाव हिच्या अपहरण झाल्याची तक्रार वडील खुशाबा बाळू पवार यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये २४ फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत चार पथकाद्वारे तपास सुरू केला .
यावेळी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत तिच्या मार्फत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज च्या साह्याने अवघ्या चोवीस तासांमध्ये अपहरणाची तक्रार असलेल्या मुलगीचा शोध लावला .सदर मुलगी ता. अथणी जि. बेळगाव येथील तिच्या आत्याच्या घरी कंटाळा आला असल्याने न सांगता निघून आली होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अपहरणाची तक्रार दाखल झालेल्या मुलगीचे अपहरण झालेच नसल्याचे उघडकीस आल्याने सुटकेचा निश्वास टाकला सदर घटनेचा छडा लावण्यासाठी डी वाय एस पी आर आर पाटील एपीआय सुशांत चव्हाण पोलीस उप निरीक्षक रविकांत गच्चे ,पोलीस हे.कॉ. संतोष तेलंग, प्रदीप जाधव ,राकेश माने, सुहास संकपाळ ,उदय कांबळे वनिता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
सदर तपासामध्ये गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मुळे तपासाला योग्य दिशा मिळाली व सदर मुलगीचा २४ तासात शोध घेणे पोलिसांना सहज शक्य झाले त्यामुळे सदर उदाहरणावरून सर्व ग्रामपंचायतींनी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविणे आवश्यक बनले आहे.









