संशयित आरोपीला जामीन मिळाल्याने घडला प्रकार : वकिलांनी दाखविला हिसका, संरक्षणाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
चेक बाऊन्स खटल्यामध्ये संशयित आरोपीला जामीन मिळाला. यामुळे फिर्यादीदार आणि त्याच्या काही साथीदारांनी त्या संशयित आरोपीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला. चित्रपटाला शोभेल अशीच ही घटना घडली. यावेळी वकिलाच्या अंगावरही धाऊन गेल्याने काही वकिलांनी अपहरणाचा प्रयत्न करणाऱयांची चांगलीच धुलाई केली. या घटनेनंतर त्या अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र पोलीस स्थानकामध्ये या दोघांमध्ये समेट झाल्याने फिर्याद दाखल झाली नाही.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. एका संशयित आरोपीने काही रक्कम घेतली होती. ती रक्कम परत देण्यासाठी चेक दिला होता. तो चेक वटला नाही. त्यामुळे त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. या खटल्यामध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यावेळी तो आपल्या वकिलासोबतच होता. त्याला जामीन मिळाला म्हणून फिर्यादीदार आणि त्याच्या काही साथीदारांनी कारगाडी घेऊनच न्यायालयाच्या आवारात प्रवेश केला.
फरफटत नेण्याचा प्रयत्न
हमारा पैसा नही दिया, उसको छोडेंगे नही, उसको किडनॅप करेंगे, म्हणून संशयित आरोपीला पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या वकिलांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या अंगावरही धाऊन जाण्याचा प्रयत्न या अपहरणकर्त्यांनी केला. वकिलावर धाऊन गेल्यामुळे इतर वकिलांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांच्या समक्षच ही घटना घडली. मात्र पोलिसांनाही ते जुमानले नाहीत.
या घटनेमुळे काही वकील संतप्त झाले. त्यांनी आपला हिसका दाखविला. हे न्यायालय आहे, न्यायालयामध्ये अशाप्रकारे मारबडव करणे किंवा हुज्जत घालणे योग्य नाही, असे सांगूनही त्या तरुणांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे वकिलांनी चांगलीच धुलाई केली. त्या संशयिताला वाहनामध्ये कोंबून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र वकिलांनी त्याची सुटका केली. या घटनेमुळे बराच उशीर गोंधळ उडाला होता.
फिर्यादीदार-संशयित आरोपीमध्ये समेट…
या घटनेनंतर मार्केट पोलिसांनी त्या सर्वांनाच ताब्यात घेतले. त्यांना मार्केट पोलीस स्थानकामध्ये नेले. यावेळी कार रस्त्यावरच बराच उशीर होती. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र फिर्यादीदार आणि संशयित आरोपींमध्ये समेट झाल्याने फिर्याद दाखल झाली नाही. असे असले तरी घडलेली ही घटना गंभीर असून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे. अनेकवेळा वकिलांवरच हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. न्यायालयातच या घटना घडत आहेत. त्याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन वकिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.









