‘अपस्मार’ अथवा ‘मिरगी’ हा आजार खरेतर इतर असांसर्गिक आजारांसारखाच नियमित औषधोपचारांद्वारे नियंत्रणात ठेवता येण्यासारखा आजार आहे. सर्वसाधारणपणे ‘फिट्स’ किंवा ‘आकडी’ या नावाने समाज-मानसात ओळखल्या जाणाऱया या आजाराविषयी मात्र अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. नुकत्याच होऊन गेलेल्या ‘राष्ट्रीय अपस्मार दिवस’ (17 नोव्हेंबर) निमित्त अपस्मार आणि त्याच्या मनोसामाजिक पैलुंविषयी समजून घेऊया…
‘अपस्मार’ आजाराचे बाहय़ स्वरुप पाहून रुग्णाचे नातेवाईक अथवा त्याच्या जवळ असलेले लोक अनेकदा घाबरून जातात. कारण त्या अवस्थेत रुग्णाच्या तोंडातून फेस येणे, शुद्ध हरपणे, संपूर्ण अथवा शरीराचा काही भाग ताठ होणे किंवा त्या भागात झटके येणे, दातखिळी बसणे, कपडय़ात लघवी होणे अशी शारीरिक लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसून येणाऱया रुग्णाच्या मेंदूमधील अधिकांश भाग प्रभावित झालेला असतो. काही रुग्णांमध्ये ठरावीक परिस्थितीमध्ये, जसे की टी. व्ही. बघताना, झोपेत असताना, काही ठरावीक प्रकारचे अन्न खाल्ल्यानंतर अगदी थोडय़ा कालावधीकरिता त्यांचे अवयवांवरील नियंत्रण सुटते. अपस्माराचा हा प्रकार ‘प्रतिक्षिप्त क्रिया अपस्मार’ (रिफ्लेक्स एपिलेप्सी) म्हणून ओळखला जातो. यामध्ये मेंदूमधील ठरावीक संवेदना केंद्रावरील नियंत्रण जाते. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या अवयवांवरच त्याचा परिणाम दिसून येतो. संपूर्ण मेंदूमध्ये प्रभाव दिसून येणाऱया अपस्माराच्या लक्षणांच्या तुलनेत ‘रिफ्लेक्स एपिलेप्सी’ ची लक्षणे तुलनेने सौम्य आणि कमी असतात. जसे–अनियंत्रित बडबड, हातवारे. अपस्मारची स्थिती ही अधिकाधिक पाच मिनिटांपर्यंतच असू शकते. त्याहून अधिक काळ अपस्माराचा झटका राहिल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे असते. अपस्माराचा झटका येऊन गेल्यानंतर रुग्ण तातडीने पूर्वस्थितीत येत नाही. त्याला खूप थकवा आलेला असतो. हळूहळू तो शारीरिक-भावनिक स्थितीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो.
अपस्माराच्या वारंवारितेचे प्रमाण आणि प्रकार रुग्णागणिक वेगवेगळे असलेले दिसून येते. कोणाला आयुष्यात एखादाच अपस्माराचा झटका येतो, कोणाला वर्षभरात तर कोणाला महिन्यात 2-3 किंवा त्याहून अधिक झटके येतात. नियमित औषधोपचारांच्या जोडीला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम-आहाराची जोड दिल्यास ‘अपस्मार’ आजाराचे रुग्ण इतर असांसर्गिक आजाराच्या रुग्णांइतकेच सामान्य आयुष्य जगू शकतात. अनेक ठिकाणी अपस्माराचा संबंध भूत-प्रेत-बाधा, अंधश्रद्धांशी जोडला जाऊन वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक कलंकांच्या भीतीमुळे काही वेळेला रुग्णांच्या कुटुंबीयांकडून हा आजार लपविण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी उपचारांमध्येही सातत्य राखले जात नाही. अपस्माराचा आजार कोणत्याही वयोगटातील, कोणात्याही लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो.
अपस्माराचे मुख्यत्वे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. ज्या प्रकारामध्ये अपस्मारांमागील कारण सापडत नाही, त्याला ‘आयडिओपॅथिक’ म्हणजेच ‘अनाकलनीय’ अपस्मार म्हणून ओळखले जाते. ज्या प्रकारामध्ये अपस्माराची कारणे कळू शकतात, त्याला ‘लक्षणात्मक’ (सिम्टोमॅटिक) अपस्मार संबोधले जाते. यामध्ये पुन्हा दोन उपप्रकार पहायला मिळतात. त्यातील एका प्रकाराला ‘रिमोट एपिल्पसी’ आणि दुसऱया प्रकाराला ‘प्रोग्रेसिव्ह एपिल्पसी’ असे संबोधले जाते. गर्भावस्थेत वा जन्मानंतर काही अवधीत बाळाच्या मेंदूला धक्का पोहोचणे वा प्राणवायूचा व्यवस्थित पुरवठा न होणे, अपघात, आघात वा संसर्गामुळे मेंदूला दुखापत होणे, पक्षाघात, मध्यवर्ती मज्जासंस्थेस इजा पोहोचणे इ. प्रकार हे रिमोट एपिल्पसीमध्ये मोडतात. मेंदूमध्ये गाठ तयार होऊन मेंदूला नुकसान पोहचल्याने अपस्माराचा झटका येणारे रुग्ण ‘प्रोग्रेसिव्ह एपिल्पसी’ प्रकारात मोडतात. एकूण अपस्माराच्या रुग्णांमध्ये ‘आयडिओपॅथिक’ अपस्माराच्या रुग्णांचे प्रमाण 77… आहे तर ‘सिम्टोमॅटिक’ अपस्माराचे प्रमाण 23… (प्रोग्रेसिव्ह 2… आणि रिमोट 21…) आहे. प्रोग्रेसिव्ह प्रकारातील अपस्माराच्या आजारामध्ये शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील गाठ काढून त्यावर उपचार करणे, हा पर्याय रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुकूल निवडला जाऊ शकतो. उर्वरित प्रकारातील रुग्णांचा अपस्मार गोळय़ा-औषधांद्वारे नियंत्रित केला जातो.
अपस्माराच्या आजाराविषयी समाजाचा दृष्टिकोण बदलणे खूप गरजेचे आहे. अज्ञानापोटी अपस्माराचा झटका आल्यावर रुग्णाला चप्पल, कांदा हुंगण्यास देणे, दातखिळी बसल्यास हातात चाव्या देणे, तोंडावर पाणी मारणे इ. गोष्टी केल्या जातात. पण असे करणे पूर्णत: अवैज्ञानिक आहे. अपस्माराचे रुग्ण झटका आल्यावर अचानकपणे कोसळतात. त्यावेळी त्यांना दुखापत होण्याची शक्मयता अधिक असते. या अपघातांपासून त्यांना वाचवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. त्यांना पाणी-आग, डोंगर-दऱया इ. ठिकाणांपासून दूर ठेवणे, वाहन चालवणे, जड/मोठय़ा यंत्रावर काम करण्यापासून दूर ठेवणे गरजेचे असते. त्यांना अतिसंरक्षण देणे वा अति काळजीपोटी त्यांना प्रत्येक गोष्ट करण्यापासून परावृत्त करणे हे मात्र कुटुंबीयांनी टाळणे गरजेचे असते. असे केल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होऊन ‘न्यूनगंडा’ची भावना वाढीस लागू शकते. कुटुंबीयांची, समाजाची अशा रुग्णाप्रती समभावाची वागणूक असली पाहिजे. दुर्लक्ष, तुच्छता, भेदभाव अशा वागणुकीमुळे त्यांच्यामध्ये इतर मानसिक-भावनिक समस्या वाढीस लागू शकतात. रुग्ण चिडचिडे, हळवे, हट्टी, नैराश्यग्रस्त होण्याची भीती बळावते. यासाठी समुपदेशक, आधार गट यासारख्या सामाजिक यंत्रणांची मदत उपयुक्त ठरते. अनेक ठिकाणी अपस्मारांच्या रुग्णांना कामावर ठेवून घेतले जात नाही. विद्यार्थ्यांना हा आजार असल्यास त्यांना शाळेत बसू दिले जात नाही. अशा रुग्णाचे वा त्यांच्या परिवारातील सदस्यांचे विवाह जुळून येण्यास अडचणी येतात. काही लोक अपस्मार असल्याची बाब लपवून ठेवत विवाह करतात. असे विवाह मात्र पुढे अडचणीत येतात. आनुवंशिकता हा घटक अपस्माराच्याबाबतीत अत्यंत कमी प्रभावकारी असला तरी गैरसमजुतीमुळे अपस्मारग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक सामाजिक अवहेलनांना सामोरे जावे लागते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अपस्माराच्या आजाराचे 5 कोटी रुग्ण आहेत. त्यातील ऐंशी टक्के रुग्ण विकसनशील देशातील आहेत. उपचारांनी नियंत्रणात राहणाऱया या आजाराचे तीन चतुर्थांश रुग्ण योग्य उपचारांपासून वंचित राहतात. भारतामध्ये आजही अपस्माराच्याबाबतीत अनेक गैरसमजुती, ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील तज्ञ डॉक्टरांचा आणि तंत्र सामग्रीचा अभाव, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, निरक्षरता, दारिद्रय़ इ. कारणांमुळे ‘अपस्मारा’वर योग्य आणि सातत्यपूर्ण उपचार घेतले जात नाहीत. कोविड महामारीच्या परिस्थितीत तर अपस्माराच्या अनेक रुग्णांचे उपचार खंडित झाले. भविष्यात योग्य नियोजन, नागरिकांमधील जागरुकता आणि अपस्मार सदृश भेदभाव विरोधी कायदा या पातळय़ांवर काम झाल्यास समाजात त्यांचा अंतर्भाव सुलभ होण्यास मदत होईल.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव








