गोव्यातील स्थळनामांचा जो अपभ्रंश झाला आहे, त्याचा हा ओझरता आलेख असला तरी तो भन्नाट, विचित्र आणि खूप वेदनादायक आहे. आपण मुक्त गोव्यात राहूनही आक्रमकांनी दिलेली नावे, त्यांचे अपभ्रंश आपण का म्हणून मिरवायची? ती बदलायला हवीत. त्याचबरोबर व्याकरणाच्या नियमानुसार भाषा बदलली म्हणून व्यक्तीचे, स्थळाचे विशेष नाम (प्रॉपर नाऊन) बदलत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. पणजे, पणजी, पॅनाजीम, पंजीम होता कामा नये. भाषा कितीही बदलल्या तरी स्थळनाम, व्यक्तीनाम बदलता कामा नये.
गोव्यातील तालुक्यांच्या, शहरांच्या, गावांच्या नावांचा जेवढ्या प्रमाणात अपभ्रंश करण्यात आलेला आहे, तेवढा अन्य कुठल्याही राज्यात झालेला नसेल. सत्तरी, काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा व फोंडा तालुक्यातील काही अपवाद वगळता उर्वरीत तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात गावांच्या नावांचा अपभ्रंश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना आपण गोव्dयात आलोय की पोर्तुगालमध्ये? की ब्रिटनमध्ये? असे प्रश्न पडणे साहजिक आहे. काही गोमंतकीयांना मात्र त्याचे सोयरसुतकही नसते.
अपभ्रंश असाच चालू ठेवायचा म्हणजे आपल्यावरील आक्रमकांच्या गुलामगिरीची परंपरा चालविणे आहे. अपभ्रंशाने तयार झालेली नावे बदलून त्याजागी मूळ नावे प्रस्थापित करता येत नाही काय या लोकशाहीत? हा प्रश्न केवळ सामान्य लोकांनाच किंवा अभ्यासकांनाच पडतो असे नाही, तर राजकारण्यांच्याही भन्नाट डोक्यात तो काहीवेळा उसळी घेत असतो. बऱ्याचवेळा राजकारणी या विषयावर मोठमोठी भाषणेही ठोकतात, पण ती खासगीत. सत्तेत आले तरी अपभ्रंश झालेल्या नावांमध्ये सुधारणा करण्याची सुबुद्धी त्यांना अजिबात होत नाही. देशभरातील अनेक राज्यांमध्ये आक्रमकांनी स्वत: दिलेली किंवा त्यांच्या चमच्यांनी, भाटगिरी करणाऱ्यांनी, गुलामांनी दिलेली नावे गेल्या अनेक वर्षांपासून बदलण्यात आली आहेत, त्याकडे गोव्याने पहायाला हवे. कर्नाटकात ब्रिटिशांनी अपभ्रंश करुन दिलेली नावे बदलून मूळ नावे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही अनेक नावे बदलली असून काही नावे बदलण्यावर चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशात नावे झपाट्याने बदलण्यात येत असून भारतीय नावे पुन्हा प्रकाशझोतात आणली जात आहेत. मध्य प्रदेशातही आक्रमक मोघल आणि ब्रिटिशांनी दिलेली गावांची, शहरांची शंभराहून अधिक नावे मूळपदावर आणली आहेत. गोवा मुक्त होऊन 62 वर्षे होत आली तरी आक्रमकांनी अपभ्रंश केलेली नावे मूळपदावर आणण्यात सरकारला आणि स्थानिक स्वराज संस्थांनाही अपयश आले. खुद्द स्वत:च्या गावाचे योग्य नाव आपल्याला माहीत नसावे, खऱ्या नावाबद्दल अभिमान नसावा, ही कसली लक्षणे? किती चांगले चुडामणी किंवा चोडण हे नाव, पण आम्हीच त्याला ‘चोर्रांव’, ‘शॉर्रांव’ म्हणायचे? एकूण काय तर जळीस्थळी पोर्तुगीजांनी अपभ्रंश केलेल्या नावांचा भडीमार आहे. अपभ्रंशामुळे पेडणे तालुक्याचे ‘पेरनेम’, सत्तरीचे ‘सत्तारी’, भतग्राम, डिचोलीचे ‘बिचोली, बारदेशचे ‘बारदेझ’ झाले आहे. अनंत उर्जा, अंत्रुज, किंवा फोंडा याचे किती वाईट ‘पोंडा’ झाले आहे. मुरगावचे ‘मार्मुगोवा’, ‘मार्मगोआ’ झाले आहे. सासष्टी किंवा साळशेतचे ‘सालसेत’, मठग्राम, मडगावचे ‘मारगाव’, धारबांदोडाचे ‘धारबांदोरा’, केपेचे ‘क्युपेंम’ सांगेचे ‘सांग्युएम’, अशाप्रकारे तालुक्यांची नावे बिघडवली आहेत. पेडणे तालुक्यातील हरमलचे ‘आरांबोल’, ‘हरंबल’, वळपेचे ‘वारपे’, मोपचे ‘मोपा’ झाले असून अन्य गावांच्या नावांपुढे विनाकारण ‘एम’ किंवा ‘ए’ लावले आहे. बार्देशमध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या म्हापसाचे ‘म्हापुका’, ‘म्हापुसा’, ‘मापुक्सा’ तर हडफडेचे ‘आरपोरा’, पर्राचे ‘पार्रा’, हळदोणेचे ‘अल्दोना’, ‘आल्डोना’ तर साळगावचे ‘सालीगांव’ ‘सालीगाओ’ उच्चारले जाते. पर्वरीचे ‘पोरवोरीम’, ‘पार्वरिम’, तर कांदोळीचे ‘कन्डोलिम’, कळंगुटचे ‘कालांगुटे’, शापोराचे ‘चापोरा’ झालेले असून अन्य गावांच्यापुढे विनाकारण ‘एम’ व ‘ए’ लावले आहे. ‘पेन्हा द फ्रान्सा’, ‘साल्वादोर दु मुंदु’, ‘सुकुरांवो’, ‘पिलेर्न’, तर बिठ्ठोणचे ‘ब्रिटोना’ आणि सुंदर एकोशीचे ‘एकोक्शीम’ असे उच्चारले जाते.
डिचोली तालुक्यात ‘बिचोली’ वगळल्यास त्या मानाने गावांच्या नावांचा अपभ्रंश कमी झाल्याचे दिसून येते. सांखळीचे ‘सांक्युलेम’ होते, ते बदलून सांखळी केले. अशाच प्रकारेही नगरपालिका व ग्रामपंचायतींनाही सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन स्वत:च्या नावांमध्ये सुधारणा करता येते. आमोणेचे ‘आमोना’, कुडणेचे ‘कुडनेम’, त्याचबरोबर अन्य अनेक गावांच्या नावांपुढे ‘एम’ किंवा ‘ए’ लावल्याचा प्रकार आहेच. राज्याची राजधानी असलेल्या पणजीचे ‘पनाजीम’, ‘पॅनाजीम’, ‘पंजीम’, ‘पैंजीम’ केले जाते. ओल्ड गोवाचे, ‘पोरनें गोंय’, ‘पुराना गोवा’ की ‘येळा’ की ‘ब्रह्मपुरी’ हे निश्चित करावे लागेल. दीपवती किंवा दिवाडी बेटाचे ‘दिवार’, तर चुडामणी किंवा चोडण, चोडणाचे ‘चोर्रांव’, ‘शॉर्रांव’ झाले आहे. ताळगावचे ‘तालीगांव’, ‘तालेगांव’ बांबोळीचे ‘बंबोली’, ‘बांबोलीम’, कुडकाचे ‘कुरका’, भाटीचे ‘बाती’ झाले आहे. मुरगावांतील अपभ्रंश तालुक्याच्या नावापासूनच सुरु होतो. मूळ मुरगावचे ‘मार्मुगोआ’, ‘मारमुगाव’, ‘मारमोगाँम’ झाले आहे. मुरगाव तालुका मुख्यालयाचे वास्को दी गामा नाव बदलायला हवे. ‘दामबाबनगर’ किंवा ‘दामबाबपुर’ करायला हवे. चिखलीचे ‘चिकालीम’, ‘चिकोलीम’ तर कुशस्थळी, कुठ्ठाळीचे ‘कोरतालीम’ केले आहे. शंखवाळचे ‘सांकवाल’, ‘सांकोआले’, ‘सांकोलेम’, तर दाबाळीचे ‘दाबोलीम’ केले आहे. भाषा बदलली म्हणून विशेष नाम (प्रॉपर नाऊन) बदलत नाही, मात्र आपल्या गोव्यात आणि आपल्या देशात स्थळनावे भाषेप्रमाणे कशी बदलतात? भारतीय भाषेत भारत तर इंग्रजीत इंडियासह सर्व नावे अशीच भाषेप्रमाणे बदलतात अगदी नवी दिल्ली, नई दिल्ली, न्यू डेल्ही, नई देहलीपासून पणजे, पणजी, पॅनाजी, पॅनाजीम, पंजीमपर्यंत हे असेच का घडते? अन्य देशांमध्ये भाषा बदलली म्हणून व्यक्ती, स्थळाचे विशेष नाम बदलत नाही. वास्तविक व्याकरणाच्या नियमानुसार हे होता कामा नये, हे सारे मुद्दे लक्षात घेऊन गोव्यातील अपभ्रंश झालेली नावे बदलून त्यांची मूळनावे प्रस्थापित करायला हवीत.
राजू भिकारो नाईक








