अशोकनगर कॅन्सर हॉस्पिटलनजीक सर्व्हिस रोडवर घडली घटना
प्रतिनिधी / बेळगाव
मोटारसायकलवरुन ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली सापडून शिवबसवनगर येथील एक तरुण जागीच ठार झाला. बुधवारी रात्री अशोकनगर कॅन्सर हॉस्पिटलसमोरील सर्व्हिस रोडवर ही घटना घडली आहे.
निखिल उर्फ जोयल गिल्बर्ट चिन्नय्या (वय 27, रा. शिवबसवनगर) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मोटारसायकलवरुन जाताना ट्रकला घासून तो ट्रकच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्मयावरुन चाक गेल्याने तो जागेवरच चिरडला गेला.
त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ओल्ड सिमेट्री येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दोन स्वतंत्र एफआयआर दाखल
या संबंधी वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करीत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल उर्फ जोयल हा सर्व्हिस रोडवरुन मोटारसायकलवरुन जात होता. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल ट्रकला घासून गेली. मोटारसायकलवरुन पडलेला तरुण ट्रकखाली सापडला. यावेळी डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. अशोकनगरकडे जाताना ही घटना घडली आहे. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









