प्रतिनिधी/ बेळगाव
देसूरहून बेळगावकडे येत असताना झाडशहापूरजवळ दोन मोटारसायकलस्वारांना टेम्पोने धडक दिली. यामध्ये सचिन जोतिबा नाईक (वय 30, रा. देसूर) हा गंभीर जखमी झाला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. त्या ठिकाणी टेम्पो मालकाने 19 लाख 90 हजार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सचिन हा 30 डिसेंबर 2019 रोजी मोटारसायकल क्रमांक केए 22 ईटी 4277 वरून देसूरकडून बेळगावकडे येत होता. यावेळी झाडशहापूरजवळ टेम्पो क्रमांक केएल 40 डी 8244 याने धडक दिली. त्यामध्ये सचिनच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर टेम्पोचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. सदर टेम्पोचा विमा नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूंचा जबाब ऐकून टेम्पो मालकाने मयत सचिन नाईकच्या कुटुंबीयांना 18 लाख 75 हजार सहा टक्के व्याजासह असे एकूण 19 लाख 90 हजार देण्याचा आदेश चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला आहे. अर्जदाराच्यावतीने ऍड. आण्णासाहेब घोरपडे यांनी काम पाहिले..









