प्रतिनिधी / उस्मानाबाद
रात्रीच्या सुमारास अपघात होऊन या अपघातात ३५ वर्षीय तरुण व त्याच्या पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच करून अंत होतो. त्यांच्यासोबत पिशवीमध्ये असलेली रक्कम परिसरातील एक उदार, मोठ्या मनाची व दातृत्व वृत्ती असलेली व्यक्ती व्यवस्थितरित्या जतन करते. मयताची राख सावडण्याच्या (तिसरीच्या) कार्यक्रमात संबंधित मयतच्या पत्नीस खात्री करुन चक्क दीड लाख रुपयाची थैली जशी होती तशीच सुपूर्द केली. एकीकडे मयताच्या टाळूवरील लोणी खाणारी वृत्ती सर्वत्र फोफावत असतानाच हा प्रकार म्हणजे पुन्हा इमानदारीच्या वाटेवर जात असल्याचे संकेत आहेत. ज्यांनी हा प्रामाणिकपणा दाखविला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र करवार.
उस्मानाबादहून गावी जात असताना उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथील सचिन तुकाराम माने (वय ३५) व पाच वर्षीय चिमुकला प्रफुल्ल हे दोघेही मोटारसायकल-आयशरची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात जागीच गतप्राण झाले. दि.८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास राघुचीवाडी नजीक हा अपघात झाला होता. यावेळी गाडीला लटकवलेली पिशवी दूर उडून पडली होती.
अपघातावेळी गाडीला लटकवलेली पिशवी दूर उडून पडली. या पिशवीमध्ये रुमालात बांधून ठेवलेले दीड लाख रुपयांचे गाठोडे राघुचीवाडी येथील राजेंद्र करवार यांनी घेऊन आपल्या घरी व्यवस्थित ठेवली. मयत व्यक्तीची सर्व माहिती व खातरजमा करवार यांनी करुन घेतली. सदरील मयत व्यक्तीने कांदे विक्री करून ज्यांचे देणे होते ते देऊन उरलेली रक्कम गावाकडे घेऊन जात होते. मात्र काळाने घाला घातल्यामुळे ती रक्कम त्या ठिकाणीच पडली. ही रक्कम त्या व्यक्तीचीच असल्याची खात्री पटल्याने राजेंद्र करवर यांनी तिसरीला राख सावडण्याचा दिवशी घटनास्थळी जाऊन दुःखाच्या सागरात बुडालेल्या माने परिवाराला एक प्रकारे इमानदारीरुपी आर्थिक मदतीची नवसंजीवनी दिल्यामुळे उपस्थितांसह सर्वांचेच डोळे या इमानदारीचे कौतुक करण्यासाठी ओलेचिंब होत पाणावले हे विशेष.









