म्हासुर्ली प्रतिनिधी
कळे- म्हासुर्ली मार्गावरील नवलेवाडी (ता.पन्हाळा ) गावाजवळ दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमर मारुती कात्रे (वय-३५,म्हासुर्ली,ता.राधानरी) या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली आहे.
म्हासुर्ली येथील अमर कात्रे हा तरुण पुणे येथे प्लम्बर म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करत होता.काही दिवसांपूर्वी गावी असणाऱ्या मुलीस पुण्यास नेण्यासाठी तो पाच – सहा दिवसांपूर्वी गावी आला होता.गुरुवार २३ डिसेंबरला सकाळी तो मुलीसह पुण्याला जात असताना, कळे- म्हासुर्ली मार्गावरील नवलेवाडी गावाजवळ दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. गेल्या चार दिवसापासून सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. चार दिवस तो बेशुद्धावस्थेत होता.अखेर आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.









