करडीगुद्दी घाटात कारची दुचाकीला धडक
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने करडीगुद्दी घाट परिसरात झालेल्या अपघातात अमटूर (ता. बैलहोंगल) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. यासंबंधी कार चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मनोज चंद्राप्पा राजण्णावर (वय 19, रा. आमटूर) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. बेळगावहून नेसरगीकडे जाणाऱया कारने मोटारसायकलला ठोकरल्याने बुधवारी दुपारी हा अपघात घडला. अपघातात मनोज गंभीर जखमी झाला.
या तरुणाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. रात्री ओळख पटवून कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.









