राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील अपंग बांधवांच्या रेशनिंग, घरकूल यासह विविध शासकीय योजनांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याकरीता विशेष मोहिम राबविण्याच्या सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी तहसील कार्यालय, राधानगरी येथील झालेल्या आढावा बैठकीमध्ये तहसीलदार मिना निंबाळकर यांना दिल्या.
राधानगरी तालुक्यातील अपंग बांधवांच्या रेशनिंगबाबत विविध प्रश्न प्रलंबित होते. यामध्ये प्रामुख्याने अपंगांना अंत्योदय यादीप्रमाणे रेशन मिळावे, याकरीता आवश्यक असणारा 14 हजार रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणे. पुरवठा विभाग यांचेकडे रेशन सुरू करणे, नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे, याबाबतचे 700 प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे अपंग संघटनेचे अध्यक्ष दत्ता सावंत यांनी सांगितले. तसेच अपंगांकरीता नव्याने होऊ घातलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यातील एकाही अंपंगाचे नाव ड यादीमध्ये समाविष्ठ झालेले नाही. याकरीता फेरसर्वेक्षण करून गरीब व गरजू असणाऱ्या अपंगांना प्राधान्याने घर मिळावे, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, अपंग बांधवांचे तहसील कार्यालयाकडे प्रलंबित असणारे प्रस्ताव वेळेत मार्गी न लावणे हे चुकीचे आहे. ज्यांना आपले दैनंदिन कामकाज करणे अडचणीचे आहे, अशा सर्व मंडळींना त्यांच्या कामाकरीता तहसील कार्यालयाच्या वेळोवेळी खेटा मारायला लावणे, ही बाब गंभीर असून अपंगांच्या भावनांशी खेळणाऱ्या तहसील कार्यालयाकडील प्रलंबित असणारे प्रामुख्याने चालु अंत्योदय यादीमध्ये समाविष्ठ करून रेशनींग चालू करणे, याकरीता तहसील कार्यालयाने विशेष मोहिम राबवून सर्व प्रस्ताव मार्गी लावावे. याकरीता लवकरच कार्यवाही करण्याची सुचना केल्या. तसेच अपंगांचा घरकूल यादीमध्ये समावेश झालेला नाही अशा गावातील पात्रता यादीचे फेर सर्वेक्षण करून अपंग बांधवांना प्राधान्याने घरकूल मंजूर व्हावे, याकरीता गटविकास अधिकारी यांनी तात्काळ सर्व ग्रामपंचायतींना पत्रक काढून फेरसर्वेक्षण करावे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता तहसीलदार यांनी कार्यवाही करावी. तसेच राधानगरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शासकीय नियुक्तीकरीता आवश्यक असणारे जातीचे दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे काही नागरीकांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत आहेत. याबाबत प्रांत कार्यालयाकडून प्रलंबित ठेवण्यात येतात. याकरीता सर्व दाखले वेळेत देण्याच्या सुचना प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांना केल्या.
यावेळी गोकूळ संचालक अभिजित तायशेटे, प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान, तहसीलदार मिना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, विजयराव बलुगडे, सचिन पालकर, अपंग संघटनेचे अध्यक्ष दत्ता सावंत, दिपक खोराटे, सजंय खोत, उदय पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते.









