वृत्तसंस्था / अबु धाबी
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत जोरदार धडक मारल्यानंतर किवीज गोटातील आनंदोत्सव साजरा होणे साहजिकच होते. पण, अवघे पथक जल्लोष साजरा करत असताना जिम्मी नीशम मात्र अगदी स्तब्धपणे बसून राहिला, अगदी केन विल्यम्सनच्या चेहऱयावरही निव्वळ स्मित हास्य होते आणि याची सोशल मीडियावर दिवसभर चर्चा रंगत राहिली.
या लढतीत विजयासाठी 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चौथा गडी गमावला, त्यावेळी 5 पेक्षा कमी षटके बाकी होती आणि अद्याप 60 धावांची गरज होती. या निर्णायक क्षणी मैदानावर उतरलेल्या जेम्स नीशमने अवघ्या 11 चेंडूत 27 धावांची आतषबाजी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला शेवटच्या 2 षटकात 20 धावांची गरज होती.
पुढे सलामीवीर डॅरेल मिशेलने किवीज विजयावर शिक्कामोर्तब केले या विजयानंतर डगआऊटमधील न्यूझीलंडच्या खेळाडूंचा जल्लोष अवर्णनीय होता. नीशम मात्र स्तब्ध बसून राहिला. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या प्रतिनिधीने नीशमला याबद्दल विचारले, त्यावेळी त्याने आपली बाजू मांडली. यात तो म्हणाला, ‘अद्याप आमचे उद्दिष्टय़ साध्य झालेले नाही. फायनल जिंकण्याचे उद्दिष्टय़ साध्य झाल्यानंतरच खरा आनंदोत्सव साजरा करता
येईल’. 2019 वर्ल्डकप फायनलमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवल्यानंतरही न्यूझीलंडचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांना विजयाच्या उंबरठय़ावरुन परतावे लागले होते. तो अनुभव लक्षात घेत नीशमने अद्याप आपले उद्दिष्टय़ साध्य झाले नसल्याचे स्वतःला जणू बजावून ठेवले होते, हेच येथे अधोरेखित झाले.









