अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जसा फलंदाजीत निष्णात आहे, त्याचप्रमाणे गोलंदाजीतही निष्णात आहे. क्षेत्ररक्षणातही तो अव्वल क्षेत्ररक्षकांमध्ये तोडीस तोड योगदान देऊ शकेल, असा अव्वल खेळाडू. अर्थात, यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला फक्त स्पेशालिस्ट फलंदाज म्हणूनच खेळवले आहे. यंदा त्याच्यावर अधिक भार येणार नाही, असाच मुंबई व्यवस्थापनाचा प्रयत्न राहिला आहे आणि याचे कारण अलीकडेच उलगडले आहे. ते म्हणजे, आयपीएल स्पर्धेनंतर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हार्दिक पंडय़ा भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल आणि त्यावेळी देखील तो ताजातवाना रहावा, यासाठी मुंबई इंडियन्सने हा उदार निर्णय घेतला असल्याचे संकेत आहेत.
हार्दिक पंडय़ा आता पूर्ण तंदुरुस्त आहे आणि तो उत्तमरित्या सावरला आहे. मात्र, आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर भारतीय संघ भरगच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्याच्यासारख्या खेळाडूचे तंदुरुस्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया व पुढे इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. याशिवाय, पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे, ते विसरुन चालणार नाही, असे सूत्राने नमूद केले.
‘प्रदीर्घकालीन क्रिकेट कार्यक्रम पाहता आम्हाला छोटा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. हार्दिक पंडय़ा ज्या संघातून खेळतो, त्या संघातील तो महत्त्वाचा खेळाडू असतो. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद त्याच्याकडे असते. त्यामुळे, आम्हाला त्याच्यासारखा खेळाडू हाताळताना स्वतंत्र विचार करावा लागतो’, असेही या सूत्राने स्पष्ट केले.
पंडय़ाने शस्त्रक्रियेनंतर प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर आयपीएल स्पर्धेच्या रुपाने व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नंतर तो मार्चमध्ये पूर्वनियोजित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार होता. पण, ती मालिका कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे रद्द करण्यात आली होती.









