भ्रष्टाचार विरोधी जनक्रांती आघाडीचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी दिला होता इशारा
इचलकरंजी / प्रतिनिधी
कोल्हापूर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड यांनी रेखांकनाच्या अंतिम शिफारशीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली. या मागणीमुळे त्यांना नोकरीतून तात्काळ बडतर्फ करावे, अन्यथा मागणीसाठी मंगळवारी आत्मदहन करण्याबाबतचा इशारा येथील भ्रष्टाचार विरोधी जनक्रांती आघाडीचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी इशारा दिला होता. त्यामुळे मंगळवारी येथील प्रांतकार्यालयासह मुंबईतील मंत्रालय अशा विविध १४ ठिकाणासमोर अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान गडगे यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या आश्वासनामुळे आत्मदहन आंदोलन स्थगित केल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रेखांकनास अंतिम शिफारशीस नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकाची मान्यता लागते.
त्यामुळे जिल्ह्यातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रेखांकनाची अंतिम शिफारशीची फाइल कोल्हापूर विभागाचे सहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आली होती. यावेळी त्यानी संस्थेच्या रेखांकनाच्या अंतिम शिफारशीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. इतकी मोठी रक्कम न दिल्याने गायकवाड यांनी त्या कामाची फाईल इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्याच्याकडे न पाठवता गेल्या आठ महिन्यांपासून स्वत:च्या कार्यालयात ठेवून घेतली होती.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सुरेश गडगे यांनी राज्याचे प्रधान सचिव, नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गायकवाड यांच्या विरोधात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. तरी देखील संबंधीतानी यांची गांभीर्याने दखल न घेता याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे गडगे यांनी राज्याचे प्रधान सचिव, नगररचना, जिल्हाधिकारी, मुल्यनिर्धारण विभाग, सहाय्यक संचालक, इचलकरंजी प्रांताधिकारी यांच्यासह विविध चौदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे गायकवाड यांना बडतर्फ करावे, अन्यथा या मागणीसाठी 2 मार्च रोजी आत्मदहन करण्याबाबतचा इशारा दिला होता.
येथील नरेश भोरे या युवकाने आपल्या विविध मागणीवरून नगरपालिकेत आत्मदहन केले होते. हे प्रकरण प्रशासनाला चांगलेच शेखले होते. यांची दखल घेवून गडगे यांच्या आत्मदहन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील प्रांतकार्यालयासह मुंबईतील मंत्रालय अशा विविध १४ ठिकाणासमोर अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.









