प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकिय इमारत परिसरात पथदिवे बंद असल्याने बुधवारी रात्री अंधार पसरला होता. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना ही बातमी समजताच त्यांनी फोन करुन संबंधित अधिकार्यांना सुचना केल्या. त्यानंतर काहीवेळातच हे पथदिवे दुरुस्त होऊन हा परिसर लख्ख प्रकाशमय झाला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातील पथदिव्यांमध्ये काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड असल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी काळोख पसरत होता. त्यामुळे अधिकारी -कर्मचायांना अंधारातूनच कार्यालयातून बाहेर पडावे लागत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनिमित्त आलेल्या महिला अधिकाऱ्यांनी ही बाब जिल्हाधिकारी रेखावार यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला.
अनेक महिला अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून शासकीय कामकाज पार पाडतात. अशा वेळी महिलांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तात्काळ पथदिवे दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी संबंधित अधिकायांना केल्या. या विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लगेच या परिसराला भेट देवून पाहणी केली. तसेच पथदिव्यांची दुरुस्ती करुन घेतली. यामुळे हा परिसर प्रकाशमान झाला.