प्रतिनिधी/ बेळगाव
‘नाक दाबले की तोंड उघडते’ याचा प्रत्यय बेळगावकरांनी बसथांब्यांच्या समस्येबाबत घेतला. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून या बसथांब्यांची दुरवस्था प्रशासनानेसुद्धा पाहिली होती. परंतु ‘तरुण भारत’ने आता स्मार्ट नको पण स्वच्छ बसथांबे द्या, असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना धारेवर धरताच बुधवारी सकाळी बसथांबे स्वच्छ करून चकचकीत करण्यात आले.
आजपर्यंत या बसथांब्यांमध्ये प्रवाशांना बसणे अशक्मय होते. कचरा, माती आणि एकूणच अस्वच्छता, यामुळे प्रवासी वैतागले होते. तासन्तास बसची प्रतीक्षा करताना आसनव्यवस्था असूनही त्यांना अस्वच्छतेमुळे त्यांचा लाभ घेता येत नव्हता. या एकूणच समस्येवर ‘तरुण भारत’ने प्रकाश टाकला. आमदारांनी त्याची पाहणी केली आणि सोमवारी संध्याकाळीच फरशी बसविण्याचे काम सुरू झाले.
बुधवारी सकाळी बसथांब्यांमधील सर्व कचरा काढून बसथांबे स्वच्छ करण्यात आल्याने नेहमीपेक्षा बुधवारी बसस्थानकात प्रवाशांची संख्याही वाढली आणि आसन व्यवस्थेची सुविधाही त्यांना घेता आली. बेळगावमध्ये कार्यरत असणारे महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नेहमी वाहनांतून प्रवास करत असल्याने त्यांना जनतेच्या समस्यांची कल्पना नसते. मात्र, वाहनांतून प्रवास करतानासुद्धा त्यांना ही अस्वच्छता दिसली नाही का? हा प्रश्न उरतोच.
मात्र, माध्यमांनी समस्या मांडताच लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेऊन अधिकाऱयांची झाडाझडती घेईपर्यंत बेळगावच्या समस्यांचे निराकरण होणार नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.









