प्रतिनिधी / म्हापसा
कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी म्हापसा गांधी चौकात पोलीस खात्यातर्फे कोरोनाचे गीत गाण्यासाठी सर्व पोलीस अधिकारीवर्ग उपस्थित होते. गांधी चौकात सर्वत्र पोलीस असल्याने येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी ‘ए कोरोना हमको है रोखना, रोखोगे हम उसे घरपेही रहना’ असे जनजागृती गीत सादर करून सर्वांकडून वाहवा मिळविली.
दरम्यान, यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस उत्कर्षू प्रसन्नू यांचा मंगळवारी 7 एप्रिल रोजी वाढदिवस होता. जनजागृतीची पाहणी करण्यासाठी ते म्हापशात आले असता गांधी चौकामध्ये सर्वत्र पोलीस छावणीचे स्वरूप होते. या पोलीसवर्गातर्फे केक आणला होता. मात्र डय़ुटी बजावत असताना केक कापायचा कसा हा यक्षप्रश्न होता. अधीक्षक प्रसन्नू यांनी केक कापण्यास नकार दिला मात्र तेथे उपस्थित असलेले उपअधीक्षक एडवीन कुलासो, उत्तम राऊत देसाई व इतर पोलीस अधिकारीवर्ग निरीक्षकांनी एकच आग्रह केल्याने ते राजी झाले मात्र चारही दिशेने पाहून कुणीही पॅमेरामधून छबी काढणार नाही याची पाहणी केली व निरीक्षक मिलींद भुईंबर यांच्यावर कुणी पॅमेरामधून फोटो काढणार नाही याची जबाबदारी सोपविली व अखेर गांधी चौकात रस्त्यावर मधोमध प्लास्टिकची छोटी खुर्ची टाकून अखेर अधीक्षक उत्कर्षू प्रसन्नू यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला आणि जनजागृतीसाठी आणलेल्या माईकवर सर्वांनी बर्थडे गीत गाऊन केक कापून ते पणजीच्या दिशेने आपल्या कार्यालायात पुढील डय़ुटीसाठी गेले. उपस्थित असलेले पत्रकारही छबी घेणार नाही याकडे लक्ष ठेवण्यासाठी खास तिघांचे पथक व अन्य काही पोलीसवर्ग पत्रकारांना गराडा घालून ठेवले. मात्र छुप्या पॅमेरामधून त्या बर्थडेचा फोटो मात्र पत्रकारांकडून चुकला नाही हे मात्र खरे.