प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे कामधंदा बंद झाला. त्यामुळे परप्रांतीयांची घालमेल वाढली. आता येथे काम नसल्यामुळे आपण आपल्या घरी गेलेले बरे म्हणून ते जाण्यासाठी धडपडू लागले आहेत. सेवा सिंधू ऍपच्या माध्यमातून अर्ज करून त्यांनी जाण्याची परवानगी मिळविली. आता जिल्हा प्रशासनानेही त्यांची नोंद करून त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी तयारी केली आहे.
सीपीएड मैदानावर परप्रांतीय नागरिकांची नोंद करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सेवा सिंधू ऍप तसेच त्यांना देण्यात आलेल्या परवानगीची छाननी कामगार कार्यालयाचे उपायुक्त वेंकटेश करत आहेत. बेळगाव येथून हुबळीपर्यंत या परप्रांतीयांना बसने नेण्यात येणार आहे. तेथून रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठविण्यात येणार आहे. बिहारमधील 430, झारखंडमधील 167 आणि उत्तर प्रदेशमधील 535 जणांनी नोंद केली आहे.
सोमवार दि. 18 रोजी बिहारला जाणाऱयांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर 19 रोजी झारखंड तर 21 मे रोजी उत्तर प्रदेश येथील कामगारांना पाठविण्यात येणार आहे. सीपीएड मैदानावर आपल्या नावाची नोंद करण्यासाठी परप्रांतीय कामगारांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर आपल्या लहान मुलांसह त्या ठिकाणी ठाण मांडले होते. कामगार कार्यालयातील कर्मचारी या सर्वांचे आधारकार्ड तसेच केलेली नोंद याची माहिती घेत होते. भर उन्हामध्ये या कामगारांना धडपड करावी लागत होती. कामगार कार्यालयानेही अत्यंत शिस्तबद्धरितीने या सर्वांची नोंद करून त्यांच्या तिकिटाचे पैसेदेखील जमा करून घेतले आहेत. या परप्रांतीयांचे त्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांची नोंद करण्यात येत होती.
कामगार उपायुक्त वेंकटेश सिंदीहट्टी
परराज्यात जाणाऱया कामगारांची नोंद करून घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी एकूण 1132 जणांनी नोंद केली. त्या सर्वांची थर्मल स्क्रिनिंग चाचणी करून नाव नोंदवून घेण्यात आले. त्यांना दिलेल्या तारखांना सीपीएड मैदानावर बोलाविण्यात आले आहे. त्यानंतर बसमधून त्यांना हुबळीला नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









