साधारणपणे हजार किलो वजन, दगड देतो जुन्या काळाची साक्ष : दगडावर इंग्रजी शब्द,आकडे
प्रतिनिधी / बेळगाव
एखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या कारकिर्दीत जेव्हा अति उल्लेखनीय असे कार्य घडून जाते तेव्हा त्या घटनेला किंवा कृतीला मैलाचा दगड असे संबोधण्याची पद्धत आहे. अंतर मोजण्याच्या मैल या एककाने दिशा दर्शविला जाणारा हा दगड यामुळेच चर्चेत येतो. सध्या किलो मिटरमध्ये अंतर मोजण्याच्या काळात असाच एक मैलाचा दगड चर्चेत आला आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात येवून कधी लपलेल्या, हरवलेल्या या दगडाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. यामुळेच एक पुरातन ठेवा म्हणून तो आता जपला जाण्याची गरज आहे.
पूर्वीच्या काळी बेळगाव हे अवघ्या 18 गल्ल्यांनी बनले होते. या 18 गल्ल्यांच्या बाजूने शेजारील शहरांना आणि गावांना जोडणारे रस्तेही होते. कपिलेश्वर मंदिरालगत शनिमंदिरला जोडून असलेला रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग हा गोवा रोड म्हणून ओळखला जायचा. याच मार्गावर दिशादर्शक दगड ब्रिटिशांनी रोवलेले होते. त्यापैकीच एक दगड राजेश वाळवेकर या जाहिरात क्षेत्रात कार्यरत व्यक्तीच्या नजरेस पडला. शनिमंदिर ते हेमुकलानी चौक दरम्यान एका फोटो स्टुडिओच्या जवळील भागात वाळवेकर झेरॉक्स काढण्यासाठी गेले होते. पार्क केलेली दुचाकी काढत असताना त्यांना हा वैशिष्टय़पूर्ण दगड दिसला. त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली व आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली.
हा दगड खरोखरच वैशिष्टय़पूर्ण असा आहे. यावर इंग्रजी शब्द आणि आकडय़ात दिशादर्शविण्यात आल्या आहेत. पुणे 214 मैल, सुतगट्टी 17 मैल, कोल्हापूर 69 मैल असे उल्लेख आढळतात. याचबरोबरीने हुबळी, धारवाड आणि इतर शहरांसंदर्भातील अंतराच्या नोंदीही दिसून येतात. पूर्वी हा मार्ग मोकळा असायचा. त्यामुळे हा दगड सहजपणे दृष्टिस पडायचा. बांधकामे वाढली आणि तो लपला गेला. आता रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे तो नजरेस पडू लागला
आहे. साधारणपणे हजार किलो वजन असलेला आणि सहजगत्या न उचलता येणारा हा दगड जुन्या काळाची साक्ष देवून जातो.
ऐतिहासिक संदर्भांचे जतन करा !
बेळगाव शहर हे अशा अनेक वैशिष्टय़ांनी नटलेले आहे. आता याबरोबरच इतर अनेक ठेव्यांचे जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेवून ठेवा ठरणाऱया ऐतिहासिक संदर्भांचे जतन करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत, अशी इच्छा राजेश वाळवेकर यांनी व्यक्त केली.









