‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ लिफ्ट नळ पाणी योजना सुरु
आमदार विनय कोरे व माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे योगदान
आठ ते दहा गावांतील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी, ग्रामस्थांकडून `तरुण भारत’चे कौतूक
प्रतिनिधी / कोल्हापूर
लिफ्ट इरिगेशन योजना बंद असल्यामुळे धामणी खोऱ्यामधील आठ ते दहा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई होती. निम्मा फेब्रुवारी महिना झाला तरी लिफ्ट योजनेचे उपसा पंप बसविण्यासाठी दिरंगाई झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला होता. याबाबत धामणी खोऱ्यात तीव्र पाणीटंचाई'या आशयाचे वृत्त १३ फेब्रुवारी प्रसिद्ध करूनतरुण भारत’ने प्रसिद्ध करून पाणी टंचाईची दाहकता मांडली. सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर लिफ्ट योजना सुरु करण्यासाठी धावपळ सुरु झाली. आमदार विनय कोरे व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी वारणा व कुंभी कारखान्याच्या माध्यमातून अवघ्या आठवड्याभरात उपसापंप बसवून लिफ्ट योजना सुरु केली आहे. त्यामुळे धामणी नदीचे कोरडे पात्र पुन्हा पाण्याने भरले असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

कळे-सावर्डे बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यास व योग्य नियोजन केल्यास पाणी आंबर्डे बंधाऱ्यापर्यंत पोहोचते. परंतु भौगोलिक कारणाने त्यापुढील गावांपर्यंत हे पाणी पोहोचू शकत नाही. ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी २० वर्षांपासून आंबर्डे बंधाऱ्याच्या सुळेकडील बाजूकडून दरवर्षी जानेवारीपासून लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी हरपवडे, पनोरेपर्यत पोहोचवले जाते. दोन्ही तीरावरील गावांना याचा लाभ होतो. पण यंदा फेब्रुवारीचा पुर्वार्ध होऊनदेखील ही यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. २००१ पासून पन्हाळा-गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालिन आमदार विनय कोरे यांनी आंबर्डे बंधाऱ्यावर सुमारे शंभर हॉर्सपॉवरचे उपसा पंप बसवून लिफ्ट इरिगेशन योजना सुरु केली. त्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभी कारखान्यामार्फत ही योजना सुरु ठेवली. पण यंदा आंबर्डे बंधाऱ्यावरील उपसा पंप कार्यान्वित करण्यासाठी फारच विलंब झाल्यामुळे पिके पाण्याअभावी वाळू लागली होती. महिनाभरापासून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे अक्षरश: मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी हातातोंडाशी आलेल्या पिकांना जगवायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता.
पाणीटंचाईचे भिषण वास्तव `तरुण भारत’ने मांडल्यानंतर आमदार कोरे व माजी आमदार नरके यांनी वारणा व कुंभी कारखान्यामार्फत पाणी उपसापंप बसवून ते सोमवारी (२२ फेब्रुवारी) कार्यान्वित केले. तीन उपसापंपाद्वारे पाणी लिफ्ट योजनेद्वारे आंबर्डेकडील पात्रात सोडल्यामुळे धामणी नदीचे कोरडे पात्र पाण्याने काठोकाठ भरले असून हरपवडे, आंबर्डे, पणोरे, निवाचीवाडी, बळपवाडी, पाटीलवाडी, पात्रेवाडी आदी गावांतील कोमेजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.
‘तरुण भारत’सह आजी, माजी आमदारांचे आभार
धामणी खोऱ्यातील पाणी टंचाईबद्दल तरुण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन आमदार कोरे व माजी आमदार नरके यांनी तत्काळ लिफ्ट योजना सुरु केली. त्यामुळे धामणी खोऱ्यात पुन्हा एकदा पाण्याचा सुकाळ झाला असून तेथील जनतेतून तरुण भारतसह आजी, माजी आमदारांचे आभार व्यक्त केले जात आहेत.









