कोरोना संशयास्पद म्हणून सापडलेल्या इसमाचा अहवाल नकारात्मक. पोलिसांसह सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास
डिचोली / प्रतिनिधी
सोमवारी (दि. 18) रात्री हरवळे साखळी येथे आढळलेल्या एका मूळ बिहारी इसमाला ताप, सर्दी आणि श्वासोच्छ्श्वास घेताना त्रास होत असल्याने म्हापसा येथील आझिलोत पाठविण्यात आला होता. त्याच्या कोरोनासंबंधीत सर्व चाचण्या घेतल्यानंतर त्याची रवानगी मये येथील विलगीकरण केंद्रात करण्यात आली होती. त्याला कोरोना संशयास्पद लक्षणे असल्याचे सर्वत्र फैलावताच सदर इसमाला आणलेल्या तसेच त्याला हाताळलेल्या पोलीस कर्मचारी व इतरांच्या काळजात धडकी भरली होती. मात्र सायंकाळी त्याचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार सोमवारी रात्री हरवळे साखळी येथे एक इसम तापाने फणफणत असल्याची माहिती डिचोली पोलिसांना कोणीतरी दिल्यानंतर पोलिसांनी बस घेऊन जात त्याला ताब्यात घेतले. बसमधून त्याची रवानगी रात्रीच वाठादेव सर्वण डिचोली येथील नारायण झांटय़े महाविद्यालयात निवारागृहात करण्यात आली. सोमवारची रात्र गेली.
मंगळवारी (दि. 19 मे) सदर इसमाला सकाळी प्रचंड प्रमाणात खोकला यायला लागल्याने महाविद्यालयातील कर्मचाऱयांनी संशय व्यक्त करताना सदर खबर वरि÷ांना कळविली. त्यावरून डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी डिचोली सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांना सूचना करून सदर इसमाची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. त्यावरून डॉ. साळकर यांनी इस्पितळातील एका डॉक्टराला महाविद्यालयात पाठवून सदर इसमाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोरोना व्हायरसविषयीची प्राथमिक लक्षणे दिसून आली. त्यामुळे सदर इसमाला तात्काळ म्हापसा येथे आझिलोत पाठविण्यात आले.
म्हापसा येथे त्याची वैद्यकीय तपासणी करून चाचणीसाठी विविध नमुने घेऊन त्याला मये येथील विलगीकरण केंद्रात पाठविले. या प्रकरणाची वार्ता सर्वत्र पसरताच सदर इसमाला हाताळलेल्या पोलिसांसह निवारागृहातील इतर लोकांच्याही काळजात धडकी भरली. डिचोली पोलिसांनी डिचोली नगरपालिकेला सांगून आपली पोलीस बस सॅनिटाईझ करून घेतली. व पोलीसस्थानकात तीच चर्चा. तरीही राज्यात सध्या शारीरिक संसर्गाची शक्मयता शून्य असल्याने एका बाजूने मनातील भीती कमीही होत होती. पण सर्वचजण सदर इसमाचा अहवाल नकारात्मक येऊ दे रे बाबा, अशीच हाक देवाला मारत होते.
अन् अहवाल आला नकारात्मक…
अखेर सायंकाळी सदर इसमाचा अहवाल आला आणि तो नकारात्मक असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सदर इसमाला दम्याचा त्रास असल्याचे सदर वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. मात्र या प्रकरणामुळे काही काळासाठी का असेना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच सर्वत्र ही वार्ता पसरल्याने लोक एकमेकांना सतर्कही करीत असताना दिसत होते.
मुळगावातील एकाला घेतले ताब्यात
तांबडारस्ता मुळगाव येथील एका स्थानिकाकडे भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया एका मध्यप्रदेश येथून आलेल्या इसमाला वैद्यकीय कर्मचाऱयांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. सदर इसम हा गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी इटवा मध्यप्रदेश येथून गोव्यात आला होता. व तो तांबडारस्ता मुळगाव येथे एकाच्या भाडय़ाच्या खोलीत राहत होता. लोकांना सदर अनोळखी इसम अचानकपणे दिसल्यानंतर लोकांनी त्याची चौकशी केली. व सदर माहिती पोलीस आणि आरोग्यखात्याला देण्यात आल्यानंतर सदर इसमाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.









