साईखोम मिराबाई चानू ही मणिपूरच्या ईस्ट इम्फाळ जिल्हय़ातील कन्या. लहानपणी हीच मिराबाई चानू आपल्या डोक्यावरुन जळण वाहून घेऊन जात असे. अंगाखांद्यावर, डोक्यावर रोज जळणाचे ओझे हे असायचेच असायचे. पण, बालपणी पेललेले ते जबाबदारीचे ओझे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला रौप्य जिंकून देण्यासाठी जणू साहाय्यभूतच ठरले!
चानूचे बालपण तसे झगडण्यातच गेले. अठराविश्वे दारिद्रय़ामुळे एकामागोमाग एक संकटांचा मुकाबला करायचा, हे ठरलेलेच असायचे. घरचे खर्च चालवण्यासाठी रोजची कसरत असायची. नॉन्पोक कॅकचिंगा हे तिचे छोटेसे गाव. एकूण 6 भावंडांमध्ये चानू सर्वात मोठी. त्यामुळे, बऱयाचशा जबाबदारीचे ओझे तिच्यावरच होते. यातूनच रोजची चूल पेटावी, यासाठी तिला जळणही डोक्यावरुन आणावे लागत असे. कधी डोक्यावर, कधी खांद्यावर करत तिने ही जबाबदारी पेलण्यात कधी कसूर केली नाही.
वास्तविक, चानूला तिरंदाजीमध्ये करिअर करायचे होते. पण, इम्फाळमधील स्पोर्ट्स हॉलमध्ये जणू वेटलिफ्ंिटग तिची प्रतीक्षा करत होते. मिराबाईने ही बाबही स्वीकारली आणि ती वेटलिफ्ंिटगमध्ये मेहनत घेऊ लागली. कुंजाराणी देवीला आपला आदर्श मानत तिने कठोर परिश्रम घेण्यास सुरुवात केली आणि 2018 पासूनच तिला याची पोचपावती मिळत गेली.
2018 राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदकाची कमाई केली. शिवाय, क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलोग्रॅम वजन उचलत तिने विश्वविक्रमही नोंदवला. चानू ही यंदा भारताचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारी एकमेव वेटलिफ्टर होती आणि या मणिपूरच्या कन्येने पदकाच्या इव्हेंटमधील पहिल्याच दिवसात भारताला उत्तम श्रीगणेशा करुन दिला. चानूचा हा जळण वाहून नेण्यापासून वेटलिफ्ंिटग करण्याचा आणि खेडय़ापासून पोडियमपर्यंतचा केलेला प्रवास युवा पिढीसाठी अर्थातच आदर्शवत, अनुकरणीय आणि प्रेरणादायक आहे.
जेव्हा चानूच्या घरी दिवाळी साजरी होते….
26 वर्षीय चानूने टोकियोमध्ये 49 किलोग्रॅम वजनगटात रौप्य जिंकले आणि तिकडे तिचे घर अक्षरशः आनंदात न्हाऊन निघाले! भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी चानूच्या पदकावर शिक्कामोर्तब झाले आणि टीव्हीसमोर उत्कंठेने बसलेल्या कुटुंबियांनी एकच जल्लोष केला.
आईने दिलेल्या ‘गुडलक रिंग्ज’ना उजाळा…
ऐतिहासिक रौप्य व चेहऱयावरील स्मित हास्य हेच मिराबाई चानूसाठी सर्व काही अजिबात नव्हते. कारण, ऑलिम्पिक रिंगप्रमाणेच असलेले तिच्या कानातील सोन्याच्या रिंग्ज देखील खऱया अर्थाने झळाळून गेल्या. या रिंग्ज तिला तिच्या आईने आपले दागिने मोडीत काढून भेट दिले होते.
या सोन्याच्या रिंग्जमुळे चानूचे नशीब उजळेल, अशी तिच्या आईंना अपेक्षा होती आणि ती चानूने शनिवारी सार्थ करुन दाखवली. ‘मी टीव्हीवर सानूला पाहिले, त्यावेळी तिच्या कानातील इयरिंग्जकडे माझे सर्वप्रथम लक्ष गेले. 2016 रिओ ऑलिम्पिकपूर्वी मी तिला या इयरिंग्ज दिल्या होत्या. त्यासाठी मी माझे काही दागिने मोडले आणि बचतीतील थोडी रक्कमही खर्ची घातली होती. चानूने रौप्य जिंकले आणि आमच्या डोळय़ातूनही आनंदाश्रू सुरु झाले’, असे चानूच्या आई लिमा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
‘चानूने सुवर्ण किंवा एखादे तरी पदक जिंकेनच, असे आत्मविश्वासाने सांगितले होते. त्यामुळे, आमच्या अपेक्षा उंचावणे साहजिक होते. आमचे काही नातेवाईकही कालच येथे आले. आम्ही सर्वांनी एकत्रित टीव्हीवर तिचा इव्हेंट पाहिला. घरी अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही आले. असे प्रफुल्लित वातावरण आम्ही कधीच अनुभवले नव्हते’, असे चानूच्या आई यावेळी म्हणाल्या. चानूने शनिवारी आपला इव्हेंट सुरु होण्यापूर्वी टोकियोतील वेटलिफ्ंिटग एरेनामधून व्हीडिओ कॉल करत आपल्या कुटुंबियांचा आशीर्वाद घेतला आणि पदक जिंकत केवळ कुटुंबियांसाठीच नव्हे तर समस्य देशवासियांसाठी आनंदाची लहर उमटवली.









