कोगीलबन गावात मगर शिरल्याने गोंधळ : नागरिकांनी मगरीला नदीकडे लावले हुसकावून
प्रतिनिधी / दांडेली
कोगीलबन (ता. दांडेली) गावात गुरुवारी सकाळी मगर शिरली. त्यामुळे गावात एकच खळबळ माजली. मगर निदर्शनास आल्याने येथील सुज्ञ नागरिकांनी मगरीला नदीकडे हुसकावून लावले. काही नागरिकांनी मगरीचे फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ करून व्हायरल केले.
दांडेली शहराला लागून असलेल्या दक्षिण भागातील काळी नदीच्या काठावर कोगीलबन गाव आहे. या नदीच्या पात्रात सतत मगरींचा वावर असतो. मगरींची संख्या वाढलेली असून मगरी अन्नाच्या शोधात नदीपात्राबाहेर येत आहेत. गुरुवारी दिवसाढवळ्य़ा मगर कोगीलबनच्या एका गल्लीत निदर्शनाला आली. यावेळी नागरिकांनी सुरुवातीला फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर ज्या वाटेने मगर आली त्या वाटेनेच नागरिकांनी मगरीला हुसकावून लावले.
काळी नदीचे पात्र व कोगीलबन गावचे अंतर 50 फुटाहून कमी आहे. काही नागरिकांच्या घरांचे परसू नदीच्या पात्राला लागून आहेत. परसूंमध्ये मगरी ऊन्हात येऊन बसत असतात. असे प्रकार येथे वरचेवर पहावयास मिळतात.









