प्रतिनिधी / बेळगाव :
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी शनिवारी जागृती मोहीम सभेत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. सदर कार्यक्रम संपल्यानंतर बऱयाच कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकूर यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी व्यासपीठावर गर्दी केली. अतिभारामुळे व्यासपीठाचा काही भाग खचला. मात्र, वेळीच ते सावरल्याने पुढील अनर्थ टळला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत शनिवारी येथील सरदार्स मैदानावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांची जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता सुरू होणारी ही सभा दुपारी 1 वाजता सुरू झाली. तर 2.45 वाजता संपली. या जागृती सभेत अनुराग ठाकूर यांनी सुमारे अर्धा तास मार्गदर्शन केले. येथील कार्यक्रमानंतर चिकोडी येथे जागृती सभेत सहभागी होण्यासाठी ते जाणार होते. मात्र, येथील सभा संपल्यानंतर उपस्थित असणाऱया बऱयाच कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह सेल्फी काढून घेण्यासाठी व्यासपीठावरच धाव घेतली. अतिभारामुळे व्यासपीठाचा काही भाग खचला. मात्र, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वतःला सावरले. तर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही अनुराग ठाकूर यांना सावरल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.









