हेलिकॉप्टर अपघातातील पार्थिव देह नातेवाईकांच्या स्वाधीन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या भारतीय हवाई दलाच्या सर्व 4 जवानांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये जेडब्ल्यूओ प्रदीप ए, विंग कमांडर पी. एस. चौहान, जेडब्ल्यूओ राणा प्रताप दास आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंग यांचा समावेश आहे. हवाई दलातील कर्मचाऱ्यांबरोबरच लष्करातील लान्स नाईक के. बी. साई तेजा आणि लान्स नाईक विवेक कुमार यांच्या मृतदेहांचीही ओळख पटली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन दिल्यानंतर त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 14 जणांपैकी 13 जणांना प्राण गमवावे लागले होते. एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर बेंगळूरमध्ये उपचार सुरू आहेत.
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या हेलिकॉप्टरमध्ये पत्नी मधुलिका यांच्याशिवाय 13 लष्करी जवान आणि अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्वाड्रन लीडर के. सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी. साई तेजा यांचाही मृत्यू झाला होता.









