श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. महापराक्रमी रावण आपल्या कुकर्मांमुळे नाश पावला. पण त्याची लंका ही सुवर्णनगरी होती. श्रीरामांनी मनात आणले असते, तर त्या लंकानगरीवर आपला हक्क सांगू शकले असते. अयोध्येपेक्षाही ऐश्वर्यसंपन्न राज्य त्यांनी जिंकले होते. त्यांना कोणीही दोष दिला नसता. तरी त्यांनी मोठय़ा मनाने ती रामभक्त बिभीषणाकडे …रावणाच्या भावाकडे राज्य सोपवून त्यानेच दिलेल्या पुष्पक विमानातून ते लक्ष्मणासह अयोध्येला परतले. वाटेत लक्ष्मणाने त्यांना विचारले, ‘एवढी वैभवशाली सुवर्णमयी लंका सोडून का दिली?’ त्यावर श्रीरामांनी त्याला उत्तर दिले.
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि।। अर्थ- हे लक्ष्मणा, लंका जरी सुवर्णमयी असली, तरी मला ती आवडत नाही. जन्मदात्री आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रे÷ आहेत. लंका जरी वैभवशाली असली तरी तिची लालसा, आसक्ती श्रीरामांना नव्हती. तिच्यापेक्षा आपली मातृभूमीच त्यांना जास्त प्रिय वाटली. यात त्यांचे माता आणि मातृभूमीवरील आत्यंतिक प्रेम दिसून येते. म्हणूनच हे त्यांचे उद्गार सुविचार बनून अजरामर झाले. गंमत म्हणजे हे अत्यंत प्रसिद्ध सुवचन मूळ वाल्मिकी रामायणात नाही.
तर अशाच प्रकारे आपल्या मातृभूमीला कधी विसरू नये असे सांगणारी एक अन्योक्ति संस्कृतमध्ये आहे.
भुक्ता मृणालपटली भवता निपीता। न्यम्बूनि यत्र नलिनानि निषेवितानि।। हे राजहंस वद तस्य सरोवरस्य। कृत्येन केन भवितासि कृतोपकारः।।
अर्थ – अरे राजहंसा, जिथे तू कमलतंतूंचे सेवन केलेस, जलपान केलेस, कमलवेलींचा आश्रय घेतलास, त्या सरोवराच्या उपकारांची फेड तू कशी करणार आहेस? ही राजहंसाला उद्देशून अन्योक्ति आहे. यात मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे हे सांगितले आहे. जिथे आपण जन्म घेतो, जिच्या अंगाखांद्यावर खेळतो, जिच्या अन्नावर आपले शरीरपोषण होते, जेथील जलाने आपली तृष्णा शांत होते, अशा मातृभूमीबद्दलची काही कर्तव्ये प्रत्येकाने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिच्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. आपण मरेपर्यंत तिच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. प्रत्यक्षात राजहंस ज्या सरोवरात राहतो, तिथल्या प्रत्येक गोष्टीचा तो जगण्यासाठी उपभोग घेतो ते सरोवर हे त्याची जन्मभूमी आहे. तिची परतफेड तू कशी करणार? असे कवी त्याला विचारतो. पण त्याने विचारलेला प्रश्न सर्वांनाच लागू पडतो. अंतर्मुख होऊन प्रत्येक नागरिकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत, हाच ह्या अन्योक्तिचा सारांश आहे.
यानंतर थोडे संस्कृत शिकूया? आपण सध्या घडय़ाळ शिकतोय. एक ते बारापर्यंत किती वाजले? हे आपण संस्कृतमधून शिकलो. आता पुढे…
8.15…सपाद अष्टवादनम्, 7.30…सार्धसप्तवादनम्
8.45..पादोन-नववादनम्, 9.10..दशाधिक नववादनम्
10.50..पञ्चन्यून-एकादशवादनम् 12.40…चत्वारिंशाधिक द्वादशवादनम्, 3.50…दशन्यून चतुर्वादनम्।……..नमो नमः।।








