पाकिस्तानची जगाला धमकी – तालिबानला त्वरित मान्यता देण्याची मागणी
अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे पाकिस्तानच्या नेत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मोईद यूसुफ यांनी आता जगाला उघड धमकी दिली आहे. जगातील देशांनी लवकरात लवकर अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी. जर असे न घडल्यास आमच्यासमोर आणखीन एका 9/11 चा धोका असल्याचे यूसुफ यांनी म्हटले आहे. या विधानावर वाद निर्माण होताच यूसुफ यांनी घुमजाव करत स्पष्टीकरण देण्यास प्रारंभ केला आहे.
अमेरिकेत 2001 मध्ये 11 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. या हल्ल्यांचा सूत्रधार ओसामा बिन लादेन होता. या हल्ल्यांमध्ये 3 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. 10 वर्षांनी लादेनला अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये कमांडो ऑपरेशनमध्ये ठार केले होते. या हल्ल्यानंतरच अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य पाठविले होते.
पाश्चिमात्य देशांना इशारा
मोईद यांनी ब्रिटिश वृत्तपत्र ‘संडे टाइम्स’च्या पत्रकार क्रिस्टीना लॅम्ब यांना मुलाखत दिली आहे. जग आणि विशेषकरून पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या राजवटीला त्वरित मान्यता न दिल्यास आणखीन एका 9/11 चा धोका असल्याचे मोईद यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. लॅम्ब ब्रिटनच नव्हे तर जगातील दिग्गज पत्रकारांपैकी एक मानल्या जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लॅम्ब सध्या संडे टाइम्समध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्रमुख आहेत.

पाक दूतावासाकडून बचाव
मोईद यांच्या विधानाने वाद निर्माण झाल्यावर त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोईद यांचे विधान चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. तालिबानसोबत मिळून काम करण्याची गरज आहे. जर असे न घडल्यास पुन्हा 1990 च्या दशकासारखी स्थिती निर्माण होऊ शकते असे त्यांनी म्हटले होते असा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी लंडनमधील पाकिस्तानी दूतावासालाही हस्तक्षेप करावा लागला आहे. दूतावासाने एक औपचारिक पत्र पाठवून संडे टाइम्ससोबतच्या मुलाखतीच्या कथित वादग्रस्त हिस्स्याला योग्य करणे किंवा तो हटविण्यास सांगितले.
विधान हटविण्यास नकार
पण पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा संडे टाइम्सवर कुठलाच परिणाम झाला नाही. प्रसिद्ध झालेली मुलाखत अत्यंत योग्य असून त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करण्यात आलेला नसल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. युसूफ यांची मुलाखत रेकॉर्डेड असल्याचे लॅम्ब यांनी सांगितले आहे.









