प्रतिनिधी / सातारा :
आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत वारंवार आंदोलने झाली. मात्र, दरवेळी कोरोना पस्थितीमुळे प्रशासनाकडून लेखी आश्वासने देण्यात आली. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास येत्या 30 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी दि. 24 जून रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत लेखी आश्वासन देवून मागण्या सोडवण्याचे मान्य केले होते. मात्र, या गोष्टीला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून, याच मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करुन देखील संघटनेस आश्वासने देऊन झुलत ठेवण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. कोरोना संसर्गाचा विचार करुन संघटनेने प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने आंदोलने मागे घेतली. मात्र, कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरुच असल्याने दि. 30 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण, कार्याध्यक्ष विष्णू नलवडे, सरचिटणीस प्रकाश घाडगे, खजिनदार चंद्रकांत जाधव तसेच कर्मचारी उपस्थित होते.









