प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठामध्ये शिकणाऱया हजारो विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षापासूनची शिष्यवृत्ती विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे थकली आहे. यासंदर्भात गेली वर्षभर संबंधित अधिकाऱयांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना नेहमीच टोलवा टोलवीची उत्तरे मिळतात. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ ही शिष्यवृत्ती जमा करावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुंड्ट्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. अन्यथा विद्यापीठ प्रशासनाविरोधात फसवणूकीची तक्रार देण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. अत्यंत हालाखीची परिस्थिती असूनही शिक्षणाची जिद्द असल्यामुळेच हे विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. यातील बहुतांश विद्यार्थी हे विविध शिष्यवृत्ती धारक आहेत. भारत सरकार शिष्यवृत्ती घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परंतु 2017-18 व 2018-19 या साली विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होवूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 2017-18 सालातील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झालेला बदल पूर्ण करुनही 2 वर्षे झालीत, तरीही या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याच्यासंदर्भात गेली वर्षभर संबंधित अधिकायांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना नेहमीच टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत. शिष्यवृत्ती पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमधील बहुतांश विद्यार्थी बाहेरच्या जिल्हयातील असल्याने, आता त्यांना शिष्यवृत्तीची चौकशी करणे, सुध्दा अवघड झाले आहे. प्रत्येक वेळी काही दिवसात मिळेल, असे सांगण्यात आले, मात्र दोन वर्षे लोटूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. यातून विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभार उघडकीस येत आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती जानेवारी अखेर पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. शिष्यवृत्ती मिळणेस विलंब करणाऱया संबंधित अधिकायाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी. तसेच इतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्यवृत्ती तात्काळ जमा न केल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आली. या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना देण्यात आले. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही शिष्यवृत्ती संबंधीत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिले.
यावेळी प्रशांत आंबी, धीरज कठारे, हरीश कांबळे, आरती रेडेकर, जावेद तांबोळी, संदेश माने, योगेश कसबे, स्नेहल माने, निलेश कसबे शितल शेंडगे यांच्यासह ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.









