सातारा / प्रतिनिधी :
शहरात आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी नगरपालिका कमी पडते. त्यामुळे शहरात डेंग्यूचा संसर्ग वाढत आहे. डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून, सुस्तावलेली यंत्रणा कामाला लावा अन्यथा पालिकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करणार, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.
सातारा शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जशा उपाययोजना केल्या तशाच डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी केल्या नाहीत. यामुळे रोज डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र नगरपालिकेतील एक नगरसेवक याबाबत चकार शब्द काढत नाही. आरोग्य आणि स्वच्छता यंत्रणा सुस्तावलेली असल्याने डेंग्यू संसर्गीतांची आकडेवारी वाढत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकारी आणि सैनिकांनी निवेदन दिले. यावेळी शहरप्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख अभिजित सपकाळ, गणेश अहिवळे, विभागप्रमुख सुमित नाईक, शाखाप्रमुख अमोल पवार आदी उपस्थित होते.