नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांचा इशारा
प्रतिनिधी/ सातारा
शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली देवी कॉलनीच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. कचरा पालिकेच्यावतीने दररोज उचलला जात नाही. कचरा उचलण्यात यावा अशी अनेकवेळा विनंती करुनही पालिका प्रशासन कार्यवाही करत नाही. रोजच्या रोज स्वच्छता करावी अन्यथा पालिकेच्या दारात कचरा टाकला जाईल असा इशारा नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी दिलेला आहे. दरम्यान, लाईटच्या प्रश्नासाठी त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे.
शहराच्या हद्दवाढीमध्ये नव्याने देवी कॉलनीचा परिसर आलेला आहे. तो परिसर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याच्या पाठीमागे असून तसेच माने कॉलनीही आलेली आहे. तेथून अण्णासाहेब कल्याणी विद्यालयापर्यंत असा परिसर आहे. याच परिसरातील दररोजचा कचरा पालिकेच्यावतीने गोळा करण्यात यावा अशीं मागणी तेथील स्थानिकांनी नगरसेवक म्हणून शेखर मोरे-पाटील यांच्याकडे केली. त्यांनीही नागरिकांना सेवा सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी प्राधान्याने पालिकेकडे अनेकवेळा विनंती केली. परंतु पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कार्यवाही होताना दिसत नाही. त्यांनी सांगूनही आरोग्य विभागाकडून कचरा उचलला जात नसल्याने नगरसेवक शेखर मोरे-पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी देवी कॉलनीतील कचरा नियमित उचलला गेला नाही तर पालिकेच्या दारात देवी कॉलनीतील कचरा आणून टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
लाईटसाठी पाठपुरावा सुरु
सातारा डायग्नॉस्टिक सेंटर ते रिलायन्स मॉल या भागात स्ट्रीट लाईट नाहीत. पुर्वी त्रिशंकू भाग असल्याने या भागामध्ये स्ट्रीट लाईट घेण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागत होत्या. आता या भागातील लाईट आणून हा भाग कसा प्रकाशमान करता येईल यासाठी स्वतः नगरसेवक शेखर मोरे-पाटील हे प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे मागणीही केली आहे.








