निपाणी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इशारा : महादेव मंदिरातील बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / निपाणी
सार्वजनिक गणेशोत्सवावर शासनाने घातलेले निर्बंध चुकीचे आहेत. यामुळे अनेक छोटय़ा विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे याचा विचार करून शासनाने नियमात बदल करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा नियम झुगारून गणेशोत्सव करू, अशा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे.
येथील महादेव मंदिरात निपाणी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष ऍड. निलेश हत्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ऍड. हत्ती म्हणाले, गणेश मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम, लाईटिंग व्यवस्था, बँड कंपनी, सजावट साहित्य विक्री आदी विक्रेत्यांचा उदरनिर्वाह हा हिंदू सणांवर चालतो. असे असताना शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवांवर निर्बंध घातले आहेत. आधीच कोरोनामुळे मोठे नुकसान झाले असताना आता निर्बंध घातल्यामुळे आणखी किती दिवस संयम बाळगायचा, असा सवाल करत सार्वजनिक गणेशोत्सव होणारच, असे सांगितले.
पुढील बैठक 15 ऑगस्ट रोजी यावेळी साहित्य विक्रेते तसेच सुमारे 100 हून अधिक विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पुढील बैठक महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आली असून यावेळी नगरसेवक व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.








