प्रतिनिधी / सातारा :
राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यावर गॅस पाईपलाईनचे धोकादायक काम सुरु आहे, हे काम तात्काळ बंद करण्यात यावे, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत, तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाईच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, युथचे जिल्हाध्यक्ष जयवंत वीरकायदे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश गाडे, जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एन.एच.4 महामार्गावर खड्डय़ाचे साम्राज्य आहे. त्या रस्त्यावर डांबर खाणारा डांबरट कोण याची चौकशी करण्यात यावी, अनेक आंदोलनकर्त्यांनी आंदोलने करुन रस्त्याची दुरावस्था का?, शेंद्रे ते पाचवड या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करुन त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, रस्ता व्यवस्थित होईपर्यंत आनेवाडी ते तासवडे या टोलनाक्क्यवर टोल वसुली करु नये. तासवडे व आनेवाडी टोलनाका एमएच 11 सातारासाठी मोफत करावा, जुना मोटर स्टॅण्ड परिसरातील इतिहासकालिन साखरी तळे त्यालगतच काही धनदांडग्यांनी इमारतीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे तळय़ाच्या अस्तित्वाला धोका निर्माळा झाला असून, त्याची जबाबदारी सातारा नगरपालिकेने घ्यावी. मेढा रस्त्यावर काम निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे. त्याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रिपाईकडून देण्यात आला.