मराठीसह हिंदी भाषेतही बनत असलेल्या अन्य या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘इनिशिएटिव्ह फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘पॅपिटलवुड्स पिक्चर्स’च्या सहयोगाने ‘अन्य’ची निर्मिती करण्यात आली आहे. सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करीत आहेत.
‘अन्य’चं कथानक मानवी तस्करीवर आधारित आहे. एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणाऱया वास्तववादी घटनांचा वेध घेत एक भयाण सत्य मांडण्याचा प्रयत्न अन्यच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दिग्दर्शनासोबतच सिम्मी यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. जेएनयूमध्ये पीएचडी पूर्ण केलेल्या सिम्मी यांनी ‘द आर्ट ऑफ सत्याग्रह अँड द मसीहाज’ या पुस्तकाचं लेखनही केलं आहे. त्यामुळे लेखनाचा तगडा अनुभव असणाऱया सिम्मी यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना अन्यमध्ये अनुभवायला मिळणार आहे. अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे या मराठमोळय़ा कलाकारांच्या जोडीला हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनचं दर्शन या चित्रपटात घडणार असून, गोविंद नामदेव आणि यशपाल शर्मा हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. महेंद्र पाटील यांनी परिस्थिती आणि प्रसंगानुरूप मराठीचे अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. सिनेमॅटोग्राफर साजन कालाथील यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, नंदू आचरेकर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. प्रॉडक्शन डिझाईन शेखर उज्जयीनवाल यांनी केलं असून, असोसिएट दिग्दर्शकाची बाजू रॉबिन आणि राजू यांनी सांभाळली आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार विपीन पाटवा यांच्यासह रामनाथन, रिषी एस, आणि कृष्णाराज यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं असून, रोहित कुलकर्णा यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. डॉ. सागर आणि संजीव सारथी यांनी हिंदी गीते लिहिली असून, प्रशांत जामदार यांनी मराठी गीतांची धुरा सांभाळली आहे. कोरिओग्राफी साभा मयूरी यांनी केली आहे. तर निलम शेटये यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे. थनुज यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे. लवकरच अन्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.