समाधानाचा मार्ग हा पोटातून जातो, असे म्हणतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या पदार्थांची चव चाखण्यासाठी साऱयांची धडपड सुरू असते. विविध प्रकारच्या चवींचा आस्वाद घेण्याची एकत्रित पर्वणी असेल तर त्यामधून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे सुरू असलेला ‘अन्नोत्सव’ हा अशीच आनंदाची महापर्वणी घेऊन आला आहे.
येथील सी. पी. एड. मैदानावर आयोजित रोटरी अन्नोत्सव हा बेळगावातील नागरिकांसाठी खाद्यपदार्थांच्या चवींसह मनोरंजनाचाही विपुल आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. दररोज सायंकाळी अन्नोत्सवाला मिळणारा प्रतिसाद हा बोलक्मया स्वरूपाचा आहे. नागरिकांचे थवे या ठिकाणी मोठय़ा संख्येने दाखल होत असून त्यामुळे अन्नोत्सवाचे दालन भरून जात आहे. या अन्नोत्सवातील उत्साहाची मोहिनी समस्त बेळगावकरांना पडली आहे.
रोटरी अन्नोत्सवाच्या या भव्य उपक्रमात खवैय्यांसाठी अनेकविध पदार्थांची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. भेळपुरी, चाट, डोशाचे प्रकार अशा प्रकारची चटपटीत खाद्यकेंदे येथे आहेत. त्याचबरोबर छोले भटुरे, आलू परोठा, कुलचा सब्जी आणि इतर प्रकारांचीदेखील रेलचेल आहे. भारताच्या कानाकोपऱयातील विविध प्रांतोप्रांतीच्या खाद्यपदार्थांची पर्वणी या ठिकाणी उपलब्ध आहे. भोजनथाळीमधील विविध आस्वादांची पर्वणी येथे उपलब्ध आहे. याचा आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांच्या उडय़ा पडत आहेत.
मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणी, मटण मसाला, चिकनचे विविध प्रकार आणि मत्स्याहाराची विपुल श्रेणी उपलब्ध आहे. खवैय्येगिरीची संधी साधण्यासाठी इच्छुक मंडळींकरिता अनेक पर्याय येथे आहेत. त्याचबरोबर मनोरंजनाचाही मोठा खजिना आहे. त्यामुळे हा अन्नोत्सव खवैय्यांसाठी पर्वणी ठरतो आहे. या अन्नोत्सवातून मिळणाऱया निधीचा विनीयोग विविध सामाजिक उपक्रमांसाठी केला जाणार आहे. रविवारपर्यंत या उत्सवाची संधी लाभणार आहे, या उत्सवाची ही चित्रमय झलक….!









