नागरिकांची मागणी, हुंचेनट्टी मार्गाचा वापर करा, अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही वर्षांपासून बामणवाडी ग्रामस्थांना अन्नभाग्य रेशनाच्या धान्याची वाहतूक करणाऱया ट्रकचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊन देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. येत्या आठवडय़ाभरात या वाहनांनी बामणवाडी मार्गे वाहतूक बंद न केल्यास ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
हुंचेनट्टी-नावगे मार्गावर अन्न भाग्य योजनेतील धान्याचा साठा करणारी गोदामे आहेत. या गोदामातून दररोज 100 हून अधिक ट्रक रेशन धान्याची ने-आण करतात. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या अरुंद रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना धोकादायक ठरू लागली आहे. या वाहनांनी बामणवाडी मार्गे न येता पर्यायी मार्ग म्हणजे हुंचेनट्टी मार्गे वाहतूक करावी, अशी मागणी नागरिकांची लावून धरली आहे.
शाळकरी मुलांना वाहतुकीचा धोका
रेल्वेने आलेल्या रेशन धान्याचा साठा हुंचेनट्टी येथील एका हैद्राबाद कंपनीच्या गोदामात साठविला जातो. तेथून पुढे सर्व रेशनदुकानदारांना वितरित केला जातो. यासाठी या मार्गावर सतत ने-आण करणाऱया ट्रकची वाहतूक वाढली आहे. या ट्रकमुळे गावात लहान-सहान अपघात वाढले आहे. रस्ता अरुंद असल्याने ट्रक कॉर्नरवर वळणे कठीण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय या मार्गावर शाळा असल्याने शाळकरी मुलांची ये-जा असते. त्यामुळे मुलांना देखील धोका निर्माण झाला आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याची मागणी
या ट्रकची धोकादायक वाहतूक थांबवावी यासाठी, अर्पणा देशपांडे आणि ग्रामस्थांनी गोदामाच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून बामणवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊन अपघात वाढले आहेत. त्यामुळे बामणवाडी मार्गे रेशनच्या धान्याची होणारी वाहतूक थांबवून पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी मागणी होत आहे.









