प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरीनगर येथे गटारीला लागूनच विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे गटारीतून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे गटार कोसळली असून हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेव्हा मोठा अनर्थ होण्यापूर्वीच तो ट्रान्सफॉर्मर हटविणे गरजेचे आहे. हेस्कॉमने तातडीने ट्रान्सफॉर्मर हटवावा, अशी मागणी होत आहे. येळ्ळूरला जाणाऱया मुख्य रस्त्यावरच हा ट्रान्सफॉर्मर आहे. केशवनगर आणि अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरात हा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याठिकाणी वर्दळही अधिक आहे. तेव्हा हेस्कॉमने पाहणी करून तो ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविणे गरजेचे आहे. येथील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी याची पाहणी करून हेस्कॉमच्या अधिकाऱयांना माहिती दिली. मात्र त्याबाबत अद्याप पाहणी करण्यात आली नाही. हा ट्रान्सफॉर्मर कलंडला तर विद्युत वाहिन्याही तुटणार आहेत. तेव्हा तातडीने ट्रान्सफॉर्मर हटवावा, अशी मागणी होत आहे.
अनगोळ येथील दुर्घटनेनंतर तरी काळजी घ्या
अनगोळ येथे विद्युततारेच्या स्पर्शाने एका मुलाचा मृत्यू झाला. विद्युतभारीत तार तुटून खाली पडली होती. त्याचा स्पर्श झाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशाप्रकारे घटना दरवषी घडत असतात. तेव्हा हेस्कॉमने काळजी घेऊन दुर्घटना घडण्यापूर्वीच हा ट्रान्सफॉर्मर हटवावा, अशी मागणी होत आहे.









