कुडाळ / प्रतिनिधी :
सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांना जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदार नीता मंगेश परामने (रा.सोमर्डी) यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे देणे प्रशासनाने थकविले आहे.
दोन महिन्यांपूर्वी सोमर्डी ग्रामीण रुग्णालयांमध्ये जावली तालुका आरोग्य विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारणी करण्यात आली. या कोविड सेंटरमधील रुग्णांना 185 रुपये प्रति थाळी दराने जेवण पुरविण्याचे काम मंगेश अरविंद परामने व त्यांच्या पत्नी नीता मंगेश परामने यांना देण्यात आले होते. हे काम परामने दाम्पत्याने चोख बजावले. मात्र, प्रशासनाने त्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे बिल थकवले आहे. त्यामुळे परामने दाम्पत्य किराणा मालाचे पेसे देऊ शकले नाहीत. दुकानदारांनी पैशासाठी लागलेला तगादा या दाम्पत्याच्या जिव्हारी लागला. परिणामी मानसिक स्वास्थ हरपल्याने आणि रक्तदाब वाढल्याने नीता परामने यांच्यावर रुग्णालयात ॲडमिट होण्याची वेळ आली. प्रशासनाने तात्काळ त्यांचे थकीत बिल अदा करावे, अशी मागणी होत आहे.