प्रतिनिधी / कोल्हापूर
भारत भूषण ग्रँड मास्टर अनुप्रिया गावडे हिने राष्ट्रसंघाचे बालहक्क अनुसंधानातील 54 कलमे 4 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ करून विश्वविक्रम केला आहे. तीने यापुर्वी भारतीय घटनेतील 35 कलमे व उपकलमश 6 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ करून विक्रम केला होता. तर अनोज्ञा गावडे हिने वर्ल्ड कप टी-20 टेस्ट वनडे व आयपीएल स्पर्धेतील विविध विश्वविक्रम 4 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ग्रँड मास्टरचा किताब बहाल केला आहे, अशी माहिती प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनुप्रिया आणि अनोज्ञाने दिली.
अनुप्रिया म्हणाली, बालहक्क कायदे तळागाळातील बालकांपर्यंत पोहचले पाहिजेत. त्यानुसार बालकांना हक्क मिळाला पाहिजे. शांतीनिकेतनमधील इयत्ता चौथीतील अनुप्रिया व आठवीतील अनोज्ञा या दोघींची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन सहित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड एक्सलन्स, इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सहित 15 रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे. अनुप्रियाने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परीक्षेत जगात आठवा, आंतरराष्ट्रीय सामन्यज्ञान परीक्षेत अकरावा.
आयक्यूमध्ये देशात दहावा, युनिफाईड इंग्रजी ऑलिंपियाडमध्ये महाराष्ट्र व गोवा झोनमध्ये प्रथम क्रमांक, ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत देशात सतरावा, आयक्यू कॉम्प्युटर, गणित, विज्ञान, ब्रेन-ओ ब्रेन, नॅशनल वंडर किड, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत 12 सुवर्ण व 3 रौप्य व जिल्हास्तरीय तायक्वांदो परीक्षेत कास्यपदक पटकावले आहे. तिला आतापर्यंत भारतभूषण, शौर्यभारत, बालरत्न, प्रतिभा सन्मान, बॉण्ड कोल्हापूर, संविधान सन्मान, चॅम्पियन ऑफ महाराष्ट्र सह 17 राष्ट्रीय, 2 राज्यस्तरीय, 8 प्रादेशिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या दोघी डॉ. अक्षता गावडे, सी. ए. अमितकुमार गावडे यांच्या कन्या, तर माधुरी गावडे यांची नात आहे. दोघी बहिणींना शांतीनिकेतनचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्य जयश्री जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, सदानंद दिघे, आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी केले कौतुक
अनुप्रिया व अनोज्ञा यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी प्रेसक्लबमध्ये येवून दोघी बहिणींचे कौतुक केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना या दोन्ही बहिणींची कामगिरी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात शब्बासकीची थाप दिली. भविष्यात मोठे होवून क्लासवन अधिकारी व्हा, असे आवाहनही केले.