वार्ताहर / कास :
अनेक विदयार्थी शिक्षण क्षेत्रातून मोठं यश संपादन करण्यासाठी निश्चयाचा मेरू ऊराशी बाळगून वर्षानुवर्ष अभ्यास करत स्पर्धा परिक्षा देतात. अपयश येताच आपली दिशा बदलतात. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा भंग होतो. मात्र, सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यातील दुर्गम जळकेवाडी गावच्या युवकाने भावाला आलेल्या अपयशाने खचून न जाता भावाचे स्वप्न पुर्णत्वास नेण्यासाठी सीएच्या परीक्षेची निवड करुन नुकतीच सीएची अंतीम परीक्षा उत्तीर्ण होऊन भावाचे स्वप्न साकार केले.
जळकेवाडी हे अतिदुर्गम गाव. या गावात अद्याप प्राथमिक शाळाही नाही. मात्र निराक्षर असणाऱ्या आई मनाबाई व वडील ठकुजी शिंदे यांनी आपली शेती, जनावरे संभाळत आपल्या मुलांना साक्षर होण्यासाठी मुलांच्या वयाची पाच वर्ष पुर्ण होताच गावापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शासकीय आश्रम शाळा बामणोली येथे शिक्षणसाठी पाठविले. याच शाळेत मुलांचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी व घरची बेताची परिस्थीती असल्याने पार्टटाईम काम करण्यासाठी मुलांनी मुंबईकडे नातलगांच्या आधाराने धाव घेतली. प्रथम मोठा भाऊ लक्ष्मण याने काम करत सीए होण्याचा निश्चय केला. मात्र तिन वेळा परीक्षा देऊनही अपयश आल्याने व घरची जबबदारी वाढल्याने त्याने माघार घेत भावाला सीए करण्याच्या निश्चय केला. भाऊ श्रेयस शिंदेनी भावाच्या सांगण्यावरुन दहावीनंतर मुंबईमध्ये दिवसभर काम करून नाईट कॉलेजमध्ये 11 वी 12 वीचे शिक्षण पुर्ण केले. त्या पुढीलही शिक्षण मुंबईमध्येच पुर्ण करून सीए होण्यासाठी अभ्यास सुरु केला. सलग पाच वर्षाच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने दुसऱ्या वेळच्या टर्ममध्ये सीएची अंतिम परिक्षा पास झाल्याने खऱया आर्थाने भावाचे स्वप्न भावाने पुर्ण केले. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









