नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरियाणा आणि पंजाबची राजधानी चंदीगढ येथे वस्तू-सेवा कर मंडळाची (जीएसटी कौन्सिल) महत्वाची बैठक होत आहे. बैठकीच्या मंगळवारच्या प्रथम दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काही वस्तूंवरील वस्तू-सेवा कर वाढविण्यात आला असून काही वस्तू व सेवांवरील कर कमी करण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन गेमिंगवरही करासंबंधी चर्चा झाली. क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलनासंबंधीच्या करधोरणाविषयी विचार विमर्श करण्यात आला.
या सर्व निर्णयांची आणि नव्या करदरांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज बुधवारी संध्याकाळी 5 वाजता अधिकृतरित्या देणार आहेत. हे सर्व निर्णय त्वरित लागू करण्यात येणार आहेत. मंगळवारच्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्दय़ांवर विविध राज्यांनी सूचना केल्या. त्यांच्या संदर्भातही आज बुधवारी माहिती दिली जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्याच्या संबंधात मात्र चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही सेवांवरील सूट रद्द
अन्नोद्योग चालकांना एफएसएसएआय कडून मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. तसेच वृत्तपत्र, नियतकालिके आणि रेल्वेच्या सुटय़ा भागांच्या वाहतुकीवर देण्यात आलेली सूट रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापुढे हॉटेलातील वास्तव्य महाग होणार असून हॉटेल खोलीवर 12 टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच रुग्णालयातील 5,000 रुपये प्रतिदिन पेक्षा जास्त भाडे असणाऱया खोल्यांवर 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) संबंधी 28 टक्के कर लावण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे. कॅसिनो आणि गेमिंग सेवांवरील कर वाढविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जीएसटी लवाद स्थापन करणार
लवकरच अनेक स्थानी वस्तू-सेवा कर लवाद स्थापन केले जाणार आहेत. या करासंबंधीचे विवाद लवकरात लवकर निपटण्यासाठी या लवादांचे साहाय्य होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. लवादांचे स्वरुप, रचना, कार्यकक्षा आणि अधिकार यांच्या संदर्भात आज बुधवारी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
मंगळवारच्या बैठकीत पुढील वस्तू व सेवांवरील दरात परिवर्तन
ड सांडपाणी प्रक्रिया पाण्यावरील जीएसटी पूणपणे हटविला
ड रोपवे सेवेवरील 18 टक्के जीएसटी आता केवळ 5 टक्के
ड ईव्ही बॅटरी (फिटेड ऑर विदाउट) वर 5 टक्के जीएसटी
ड डबाबंद दही, लस्सी, लोणी तसेच ताकावर 5 टक्के जीएसटी
ड उकडा तांदूळ, पोहे, पर्चड् तांदूळ, पापड, पनीर, मध, अन्नधान्ये यांच्यावर 5 टक्के जीएसटी लागणार
ड बिनभाजलेल्या कॉफी बिया, अप्रक्रियाकृत ग्रीन टी वर 5 टक्के
ड गव्हाचे बार्न, तेल काढलेला तांदळाचा कोंडा यावर 5 टक्के
ड टेररिंग, तसेच अन्य वस्त्रसेवांवर (जॉब वर्क) आता 12 टक्के
ड प्रिंटींग, लिहिण्याची आणि ड्रॉइंग शाईवर आता 12 टक्के









