स्वतःच्या परीक्षा अर्जावर अभिनेत्रीचा फोटो जोडण्याचा प्रकार
बिहारमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका विद्यार्थ्याने स्वतःऐवजी एका मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम हिचा फोटो लावला आणि आश्चर्याची बाब म्हणजे या परीक्षेत तो उत्तीर्ण देखील झाला आहे. ऋषिकेश कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने 2019 च्या माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्ज भरताना या अभिनेत्रीचे छायाचित्र लावले होते. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला असला तरीही त्याच्या गुणपत्रिकेवर याच अभिनेत्रीचे छायाचित्र दिसून येते.
या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याने जाणूनबजून अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्याचा निकालही रद्द करण्यात आला आहे. जहानाबाद जिल्हय़ातील परीक्षार्थी असलेल्या ऋषिकेशने परीक्षेचा अर्ज भरतेवेळी स्वतःच्या फोटोऐवजी अभिनेत्रीचा फोटो अपलोड केला होता.
बिहार शैक्षणिक महामंडळाने सर्व परीक्षार्थ्यांना अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी दिली होती. तरीही त्याने कुठलाच बदल केला नव्हता. याचमुळे ऋषिकेश कुमारच्या प्रवेशपत्रावर हाच फोटो छापून आला. याहून आश्चर्याची बाब म्हणजे तो याच प्रवेशपत्रावर परीक्षाही देऊन आला. परीक्षेत ऋषिकेश उत्तीर्ण झाल्यावरही त्याने फोटो बदलला नाही, त्याची गुणपत्रिका व्हायरल होऊ लागल्यावर बिहार बोर्डाने त्याला नोटीस बजावली आणि निकालही रद्द केला आहे.









