प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही वर्षांपासून शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनुदानित माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागा तातडीने भराव्यात. या मागणीसाठी अनुदानित खासगी शिक्षक संघटनेने मंगळवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले आणि शिक्षण खाते व राज्य सरकारचा निषेध केला.
राज्यात अनेक माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या जागा भरण्याकडे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. याचा शैक्षणिक अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. याबाबत खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून रितसर परवानगी घेतली आहे. मात्र, अद्याप जागा भरण्यात आल्या नाहीत. माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी रितसर परवानगी घेऊन कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे अनुदानित शाळांतील शिक्षक चिंतेत आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने लावून धरली आहे.









